गणेशोत्सवावर तरी निर्बंध नकोत – शेलार

गणेशोत्सवाच्या काळात तरी निर्बंध लादू नयेत, अशी मागणी भाजप नेते आशीष शेलार यांनी केली आहे. 

ashish-shelar
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : सार्वजनिक दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप व मनसे नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी मंगळवारी रोखले. ठाकरे सरकारची पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची दडपशाही सुरू आहे. गणेशोत्सवाच्या काळात तरी निर्बंध लादू नयेत, अशी मागणी भाजप नेते आशीष शेलार यांनी केली आहे.

करोनाची इतकी काळजी असेल, तर आधी पब, बार, डिस्को बंद करून दाखवा, तिथे ‘वाटाघाटी’ केल्या जातात, मग उत्सवांवरही निर्बंध घालू नयेत, असे शेलार यांनी स्पष्ट  केले. पोलीस बळाचा वापर करून दहीहंडय़ा रोखल्या, आता पारंपरिक गणेशोत्सव साजरा करण्यावर तरी बंधने घालू नयेत, अशी अपेक्षा शेलार यांनी व्यक्त केली.

दहीहंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि गर्दी न करता साजरा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. आमदार राम कदम यांच्यासह उत्सव साजरा करणाऱ्यांना मज्जाव करण्यात आला. डोंगरी येथे माझ्या उपस्थितीत जो पारंपरिक उत्सव साजरा होणार होता, त्यावर पोलिसांनी बंदी आणून आयोजकांवर दडपशाही केली. कुलाब्यात कोकण विकास आघाडीचे पदाधिकारी कमलाकर दळवी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. मुंबईत मंगळवारी ठिकठिकाणी हेच चित्र होते. आम्ही ठाकरे सरकारच्या या कारभाराचा निषेध करतो. आम्ही आज शांततेने कायद्याचा सन्मान केला. गणेशोत्सव काळातही असाच पोलीस बळाचा वापर केलात, तर दडपशाही सहन करणार नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp leader ashish shelar demand not impose restrictions during ganeshotsav zws

ताज्या बातम्या