महाविकासआघाडी सरकारच्या काळात केवळ नगरविकासच नव्हे तर अनेक खात्यांचे निर्णय युवराज घ्यायचे, असा खुलासा करत भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. युवराजांचा बालहट्ट आणि अहंकारापायी मुंबईकरांचे जे नुकसान झाले त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी भातखळकर यांनी केली.
शिंदे विरुद्ध ठाकरे : सत्तासंघर्षाचा फैसला २५ ऑगस्टला होणार? प्रकरण ५ सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग!
महाविकासआघाडी सरकारच्या काळात ही सर्व खाती रिमोट कंट्रोलने कोण चालवत होतं? ही खाती मातोश्रीवरुन चालवली जायची की किचन कॅबिनेटमधून? असा सवाल विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना भातखळकरांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी करावी, अशी भाजपाची मागणी असल्याचे भातखळकर यावेळी म्हणाले. आरे कारशेडचा निर्णय महाविकासआघाडीने का बदलला? त्यामुळे बसलेल्या १० हजार कोटींच्या भूर्दंडाची जबाबदारी कोणाची? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, धर्मपरिवर्तन विरोधातील कायदा झाला पाहिजे, ही भाजपाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भातील खाजगी विधेयक विधानसभेच्या पटलावर ठेवल्याची माहिती भातखळकरांनी दिली. मुंबई शहरातील पश्चिम उपनगरामध्ये पश्चिम द्रृतगती महामार्गाला पर्यायी महामार्ग म्हणून १९९२ सालापासुनच्या विकास नियोजन आराखड्यामध्ये मागाठाणे ते गोरेगावपर्यंतचा रस्ता प्रस्तावित आहे. या प्रकल्पाला विशेष पायाभूत सोयीसुविधा प्रकल्प म्हणून घोषित करावं, अशी लक्षवेधी भातखळकरांनी विधानसभेत मांडली होती. या प्रकल्पाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ मान्यता दिली.