बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणौतनं शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर देत मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर तिच्या वक्तव्याच्या अनेक स्तरातून निषेध करण्यात आला होता. दरम्यान, विमानाने मुंबईत दाखल होणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला पालिकेच्या सुधारित आदेशांनुसार १४ दिवस विलगीकरणात राहावेच लागेल. सर्वासाठी नियम समान आहे. त्यातून सूट हवी असल्यास सरकारी अधिकाऱ्यांनी अर्ज करावा, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोणाचेही नाव न घेता स्पष्ट केलं होतं. यावरून आता भाजपानं टोला लगावला आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी अभिनेता आमिर खानचा संदर्भ देत महापौर किशोरी पेडणेकर यांना टोला लगावला.

“कंगना बाहेरून विमानाने येणार म्हणून तिला क्वारंटाइन करणे अनिवार्य असल्याचं मुंबईच्या महापौरांनी सांगितलं. परंतु आमिर खान तुर्कस्थानाहून अलाउद्दीनच्या चटईवर बसून मुंबईत आला होता का?,” असा सवाल भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरवरून महापौरांना टोला लगावला.

आणखी वाचा- “…मगर याद रख बाबर, यह मंदिर फिर बनेगा”, कंगनाने केलं सूचक ट्विट

आणखी वाचा- “टायगर मेमनच्या माहिमच्या घरात, ऑफिसमध्ये महापालिका बुलडोझर घेऊन घुसवलीत होती का?”

काय म्हणाल्या होत्या महापौर ?

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत आलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला विलगीकरणात ठेवण्यात आल्यामुळे विरोधकांनी सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्रशासनावर तोफ डागण्यास सुरुवात केली होती. या संदर्भात विचारले असता किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, “पालिकेनं जारी केलेल्या सुधारित नियमानुसार विमानाने मुंबईत येणाऱ्यांना सक्तीने विलगीकरणात ठेवावे लागणार आहे. या प्रवाशांना पालिकेने सुविधा उपलब्ध केलेल्या ठिकाणी किंवा स्वत:च्या घरी १४ दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. विलगीकरणाच्या नियमातून सरकारी अधिकाऱ्यांना सूट हवी असल्यास दोन दिवस आधी अर्ज करावा लागेल,” असेही त्या म्हणाल्या.