भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर सीआरझेडमध्ये बेकायदेशीर रिसॉर्ट बांधल्याचा आरोप केलाय. तसेच हा रिसॉर्ट तोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारला ५-७ जानेवारीला आदेश येतील, असं वक्तव्य केलंय. तसेच तोडकामाचे आदेश आल्यानंतर जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात आम्ही त्यांची आमदारकी रद्द करण्यासाठी आणि मंत्रीपद काढून घेण्यासाठी राज्यपाल आणि निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत, असाही इशारा सोमय्यांनी दिला. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

किरीट सोमय्या म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांना वाचवण्यासाठी खूप खोटेनाटे प्रयत्न केले. शेवटी पर्यावरण मंत्रालयाने अनिल परब यांचा रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याची नोटीस पाठवली आहे. १७ डिसेंबरच्या या नोटीसला ३ जानेवारीपर्यंत उत्तर द्यायचं आहे. मला विश्वास आहे की ५-७ जानेवारीला महाराष्ट्र सरकारकडे अनिल परब यांचा रिसॉर्ट तोडण्याचे आदेश येतील.”

“मंत्री, आमदार सीआरझेडमध्ये बेकायदेशीर बांधकाम करतो”

“फक्त अनिल परब यांचा रिसॉर्ट तुटेल असं नाही. त्यापुढे जाऊन आम्ही आणखी विभागांमध्ये तक्रारी केल्या आहेत. हे पैसे कुठून आले? स्वतःच्या नावावर मंत्री म्हणून थ्री फेज कनेक्शन घेतलं. बेकायदेशीर बांधकाम केलं. मंत्री, आमदार सीआरझेडमध्ये बेकायदेशीर बांधकाम करतो. त्यामुळे त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं अशीही आमची पुढील याचिका असेल,” असा इशारा सोमय्यांनी अनिल परब यांना दिला.

” आमदारकी रद्द करण्यासाठी आणि मंत्रीपद काढून घेण्यासाठी…”

किरीट सोमय्या पुढे म्हणाले, “तोडकामाचे आदेश आले की महाराष्ट्र सरकार किती लांबवतं हे पाहू. मात्र, तोडकामाचे आदेश आल्यानंतर जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात आम्ही त्यांची आमदारकी रद्द करण्यासाठी आणि मंत्रीपद काढून घेण्यासाठी राज्यपाल आणि निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत.”

हेही वाचा : “दिवाळीनंतर ३ मंत्री आणि ३ जावयांचे फटाके फोडणार”, किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

“पुढील ४ घोटाळे एका महिन्यात उघड करणार”

“उद्धव ठाकरे यांचे १८ नेते आणि मंत्री यांची चौकशी आणि कारवाई सुरू आहे. एकूण २८ घोटाळे बाहेर आले आहेत. दर आठवड्यात एक-एक घोटाळा बाहेर येणार याची मी खात्री देतो. पुढील ४ घोटाळे एका महिन्यात उघड करणार आहे,” असंही सोमय्यांनी सांगितलं.