मुंबई: मुंबई महापालिकेतील भाजपचे नगरसेवक गटनेते प्रभाकर शिंदे यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान निर्णय अधिकाऱ्याने अर्जावर स्वाक्षरी न केल्यामुळे शिंदे यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय लघुवाद न्यायालयाने दिला आहे. निवडणुकीनंतर साडेचार वर्षांनी हा निकाल आला आहे.
प्रभाकर शिंदे मुलुंड प्रभाग क्रमांक १०६चे नगरसेवक आहेत. निवडणुकीवेळी उमेदवारी अर्जाची छाननी केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने उमेदवारांच्या अर्जावर स्वाक्षरी केली नव्हती या कारणास्तव ही निवडणूक प्रक्रिया रद्द ठरवण्यात यावी याकरिता एका व्यक्तीने २०१७ मध्ये लघुवाद न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर शिंदे यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. निकालाच्या अंमलबजावणीस चार आठवडय़ांची स्थगिती दिली आहे. दरम्यान, निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.