महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच सुटत नसताना राज्यातील नेते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर जात आहेत. काल शिवसेना नेते संजय राऊत आणि रामदास कदम यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतली. त्यानंतर आज भाजपाचे नेते विनोद तावडे राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर पोहोचले आहेत.
विनोद तावडे यांनी राज्यपालांची भेट घेण्यामागचे कारण काय? ते स्पष्ट होऊ शकलेले नाही. भाजपाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी चर्चा झाली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होईल असा दावा केला. त्यानंतर विनोद तावडे लगेचच राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर पोहोचले आहेत.
सुधीर मुनगंटीवार यांनी लवकरच गोड बातमी येईल असे विधान केले आहे. त्यापार्श्वभूमीवर विनोद तावडे यांची भेट महत्वपूर्ण ठरते. कारण भाजपा स्वबळावर सत्ता स्थापनेचा प्रयत्न करु शकतो अशी चर्चा आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने विनोद तावडे यांचे तिकीट कापले होते. त्यांच्याजागी सुनील राणे यांनी बोरीवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. सुनील राणे यांनी सुद्धा मोठया मताधिक्क्याने विजय मिळवला.
