मुंबई: उद्धव ठाकरे यांनी वरळी येथील ‘निर्धार’ मेळाव्यात भाजपच्या निष्ठावंताचा कळवळा घेतला, पण शिवसेनेतले निष्ठावंत का पळाले याचाही त्यांनी विचार करावा, असा टोला मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी लगावला आहे. ‘ईव्हीएम’च्या रडगाण्याला मतदार आता कंटाळलेत, असाही खोचक सल्ला साटम यांनी ठाकरे बंधूंना दिला आहे.
वरळीतील एनएससीआय डोम येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी आपल्या पक्षाचे विभागप्रमुख ते उपशाखाप्रमुख पदापर्यंतच्या पदाधिकाऱ्यांचा निर्धार मेळावा घेतला होता. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी मतदार यादीतील घोळ शोधून काढण्याच्या सूचना दिल्या. तसेच या भाषणात त्यांनी भारतीय जनता पक्षासह, पंतप्रतधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टिका केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की भाजपमध्ये निष्ठावंतांना केवळ सतरंज्या उचलाव्या लागतात. नव्या कार्यालयामुळे निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना सतरंज्या उचलण्यासाठी नवी जागा मिळाली, असाही आरोप त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी समाज माध्यमांवरून प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेतील निष्ठावंत का पाळाले याचा विचार उद्धव ठाकरे यांनी करावा असा सल्ला साटम यांनी दिला आहे. त्यामुळे समाजमाध्यमांवर ठाकरे यांचे शिवसैनिक आणि भाजपचे कार्यकर्ते असा वाद रंगला आहे.
भाजपचे कार्यालय उभे राहते पण मरीन ड्राईव्ह येथील मराठी भाषा भवन रखडते असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात उपस्थित केला होता. त्यावर ‘मराठी भाषा भवना’चे भूमिपूजन उद्धवजी मुख्यमंत्री असताना झालेले. मग, बांधकाम का नाही झाले, हे त्यांनी सांगावे, असे प्रत्युत्तर साटम यांनी दिले आहे. ‘चर्चगेट’च्या भाजपा कार्यालयाच्या भूखंडाचा व्यवहार सार्वजनिक आहे. ‘कलानगर’मधील नव्या ‘मातोश्री’ बंगल्याच्या भूखंडाचा व्यवहार आम्हाला आठवतो. ज्यांनी करोना काळात खिचडी आणि शव बॅगांच्या निविदेत घोटाळे केले. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना कंत्राटदाराचे सुपारीबाज म्हणावे, हा मोठा विनोद आहे. ‘मुंबई तोडली जाणार’… या कथानकात उद्धवजींनी बदल करावा असाही सल्ला साटम यांनी दिला आहे.
ठाकरे यांच्या शिवसेनेची १९९७ ते २०२२ दरम्यान मुंबई महापालिकेवर होती. या काळात मुंबईतले रस्ते, मुंबईतले नाले, नाल्यातला गाळ, मुंबईतला कचरा तसेच कोरोना काळात ऑक्सिमीटर, थर्मामीटर, बॉडी बॅग वाळवीसारख्या कुणी खाल्ल्या हे मुंबईकरांना चांगले माहिती आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये या प्रवृत्तीवर औषध मारण्याचे काम मुंबईकर करणार आहेत, अशीही टीका साटम यांनी केली आहे.
