मुंबई : मुंबईच्या आर्थिक विकासाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी निती आयोगाकडे सोपविण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे बुधवारी राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले. ‘‘मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा भाजप सरकारचा डाव उघड झाला’’, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केला. दुसरीकडे, भाजपचे धोरण संघराज्य रचनेला मारक असल्याची टीका ‘आप’चे खासदार राघव चड्ढा यांनी केली.

मुंबईच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी आराखडा तयार करण्याची जबाबदारी निती आयोगाकडे सोपविण्यात येणार आहे. याबाबत निती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंगळवारी सरकारपुढे सादरीकरण केले होते. या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत भाजपला लक्ष्य केले.

हेही वाचा >>> “अजित पवार गटाला त्यांची जागा…”, मविआच्या बैठकीतून शरद पवारांचा इशारा

‘‘मुंबई वेगळी करण्याचा भाजपचा डाव लपून राहिलेला नाही. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना असा प्रस्ताव आणण्याचे धाडस केंद्राने कधी केले नाही. त्यातूनच महाविकास आघाडीचे सरकार भाजपने पाडले’’, असा आरोप ठाकरे यांनी केला. ‘‘थोडे दिवस थांबा, आम्ही राज्यात आणि केंद्रात सत्तेवर आल्यानंतर त्यांनी जे-जे उफराटे निर्णय घेतले ते रद्द करू’’, असे ठाकरे म्हणाले.

‘‘निती आयोगाकडे जबाबदारी सोपवून मुंबईवर नियंत्रण मिळविण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे. पण, शिवसेना त्यास विरोध करेल. मुंबई महाराष्ट्रापासून कदापिही वेगळी होऊ देणार नाही’’, असा इशाराही ठाकरे यांनी दिला. केंद्रात आणि राज्यात ‘इंडिया’ आघाडी सत्तेत येताच मुंबईची आणि राज्याची स्वायत्तता मारून आवळलेले पाश तोडून टाकल्याशिवाय राहणार नाही, असा असेही ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >>> “उद्धव ठाकरे हे आमचे वकील, त्यांनी आमची…”; प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य चर्चेत

‘‘आपण देशाच्या सरकारला संघराज्य पद्धतीचे सरकार म्हणतो. दोन-तीन विषय सोडले, तर प्रत्येक राज्याला समान अधिकार आहेत. परंतु, केंद्रातील भाजप सरकार शहरांची, राज्यांची स्वायत्तता मारून टाकत आहे. त्याची सुरुवात दिल्लीपासून त्यांनी केली. ज्यावेळी केंद्राने वटहुकूम काढला त्याचवेळी आम्हाला भीती वाटत होती. केंद्र सरकारचा हस्तक्षेप खूपच वाढला आहे. त्यांना एकछत्री सरकार हवे आहे, परंतु, त्यांची ती छत्री आम्ही मोडून -तोडून टाकल्याशिवाय राहणार नाही’’, असा इशारा ठाकरे यांनी दिला. ‘‘उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असते, तर मुंबई महाराष्ट्रापासून तोडता आली नसती, त्यामुळे राज्यात एक वर्षांपूर्वी शिवसेना फोडण्यात आली. आता निती आयोगाच्या माध्यमातून मुंबई गिळंकृत करण्याचा डाव मोदी- शहांच्या भाजपने आखला आहे’’, असा आरोप ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. शिवसेना सोडण्यासाठी भाजपने आपल्याला १०० कोटी रुपयांची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट राऊत यांचे छोटे बंधू आमदार सुनील राऊत यांनी केला.