स्वबळावर निवडणूक तयारीची रंगीत तालीम
आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढविण्याचे भाजपने ठरविले असून महाराष्ट्र दिनापासून शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, शोभायात्रा, प्रभातफेऱ्या, आरोग्य शिबिरे, दुष्काळ मदतफेऱ्यांसह अनेक कार्यक्रमांचे आयोजन महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात १ मे रोजी करण्यात आले आहे. तर भाजपचे कार्यकर्ते ३ ते ९ मेदरम्यान घरोघरी जाऊन केंद्र व राज्य सरकारच्या कामगिरीची यशोगाथा जनतेपर्यंत पोहोचविणार आहेत. ‘छत्रपतींचा आशीर्वाद, द्या भाजपला साथ’ हा संदेश घेऊन भाजपचे कार्यकर्ते मुंबईकरांच्या घरोघरी जाऊन निवडणूक तयारीची रंगीत तालीमच करणार आहेत.
भाजपने शिवसेनेला महापालिकेतील सत्तेतून खेचण्यासाठी स्वबळावर तयारी सुरू केली असून महाराष्ट्र दिनी शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. विमानतळाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी भव्य सजावट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवाजी महाराजांना अभिवादन करणारा मुख्य कार्यक्रम होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद भाजपलाही आहे आणि शिवसेनेकडे त्याबाबत ‘कॉपीराइट’ नाही, हे दर्शविण्याच्या दृष्टिकोनातून हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. भाजपचे खासदार, आमदार, नगरसेवक यांच्या मदतीने प्रत्येक प्रभागात दोन-तीन तरी सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम होतील, असे नियोजन असल्याचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशीष शेलार यांनी सांगितले.
आठवडाभर मोहीम
सरकारची कामगिरी घरोघरी जाऊन जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठीही आठवडाभर मोहीम राबविली जाणार आहे.
भाजपनेही मुंबईकरांसाठी काम केले
१९९५ मध्ये युती सरकार असताना मुंबईत ५५ उड्डाणपूल बांधण्यात आले, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग बांधण्यात आला आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूची पायाभरणी झाली, हे प्रकल्प केवळ भाजपनेच मुंबईकरांसाठी केल्याचा दावा केला आहे. तीन ते सात हे मुंबई मेट्रो प्रकल्प, शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू, स्मार्ट सिटी योजना, इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, सीसीटीव्ही यांसह एलिव्हेटेड रेल्वे मार्ग आणि रेल्वेचे मुंबईतील विविध प्रकल्प साकारले जात असून त्याचे श्रेय भाजपचेच असल्याचे जनतेपर्यंत आक्रमकपणे पोहोचवून शिवसेनेला लक्ष्य केले जाणार आहे.
