भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. बुधवारी संध्याकाळी मुंबईत त्यांनी भाजपाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली. तसेच, महाराष्ट्र आणि मुंबई भाजपाच्या काही बैठकाही त्यांनी घेतल्या. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून मुंबई महानगर पालिका निवडणुकांची जोरदार तयारी सुरू करण्यात आल्याचं दिसू लागलं आहे. यावेळी कार्यक्रमात बोलताना भाजपाच्या सर्वच नेतेमंडळींनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. मात्र, कांदिवलीत झालेल्या भाजपाच्या पन्नाप्रमुखांच्या कार्यक्रमात ऐनवेळी लाईट गेल्याने भाजपा कार्यकर्त्यांवर मोबाईल टॉर्च लावण्याची वेळ आली!

नेमकं झालं काय?

जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे काही कार्यक्रम पक्षाकडून आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात नड्डांसह भाजपाच्या काही वरीष्ठ नेत्यांनी पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कांदिवलीत आयोजित करण्यात आलेल्या पन्ना प्रमुखांच्या कार्यक्रमात व्यासपीठावर नड्डा यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई शहर अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार आदी वरीष्ठ नेतेमंडळी उपस्थित होती. मात्र, नेत्यांची भाषणं चालू असतानाच सभागृहातली लाईट गेली आणि तारांबळ उडाली.

अंधारात भाषणाला सुरुवात!

लाईट गेल्यामुळे उपस्थित पदाधिकाऱ्यांपैकी काहींनी लागलीच मोबाईलमधील टॉर्च लावला. त्यामुळे सभागृहात काही प्रमाणात का होईना, प्रकाश दिसू लागला. लाईट लवकर येत नसल्याचं पाहून भाजपाचे मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार यांनी अंधारातच भाषणाला सुरुवात केली. व्यासपीठावरील मान्यवरांची ओळख करून देईपर्यंत लाईट आली आणि सगळ्यांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला. लाईट आल्यानंतर आशिष शेलारांनी “आता तरी तुम्हाला लक्षात आलं असेल की जेव्हा मी उभा राहातो तेव्हा काळोख जातो”, असं म्हणत वेळ मारून नेली.

“मला वाटतंय उद्धवजींना कुणीतरी सांगावं की…”, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला; म्हणाले, “राजे-महाराजांपेक्षा…!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवेंद्र फडणवीस पूर्णवेळ फोनवर!

दरम्यान, एकीकडे सभागृहात ऐन कार्यक्रमात लाईट गेल्यामुळे पंचाईत झाली असताना दुसरीकडे व्यासपीठावर राष्ट्रीय अध्यक्षांच्या बाजूलाच बसलेले देवेंद्र फडणवीस मात्र यादरम्यानच्या पूर्ण वेळात फोनवरच होते. लाईट आल्यानंतर पुढच्याच क्षणी देवेंद्र फडणवीसांनी फोन ठेवून दिला. त्यामुळे फडणवीस बहुधा यादरम्यान संबंधित कर्मचाऱ्यांची खरडपट्टी काढत असावेत, असं बोललं जात आहे.