मुंबई : भाजप-शिवसेना जागावाटपाच्या चर्चेला बुधवारी सुरुवात झाली. विधानसभा निवडणूक युतीनेच लढण्याचा भाजपचा निर्णय असून आधी घटकपक्षांना किती जागा द्यायच्या, याचा निर्णय होईल, असे ज्येष्ठ भाजप नेत्याने सांगितले.
विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेबरोबर युती करणार असल्याचे अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. आता जागावाटपाच्या चर्चेला उभय पक्ष्याच्या नेत्यांनी सुरुवात केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि शिवसेनेकडून सुभाष देसाई यांच्यात प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे. रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, शेतकरी संघटना, शिवसंग्राम पक्ष हे भाजपबरोबर असून त्यांना किती जागा सोडायच्या, हे आधी ठरविले जाणार आहे, असे भाजप नेत्यांनी सांगितले. शिवसेनेचा मात्र निम्म्या जागांचा आग्रह आहे. घटकपक्ष भाजपबरोबर असून ते भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याने त्यांना भाजपने आपल्या कोटय़ातून जागा द्याव्यात, असे शिवसेनेचे म्हणणे आहे.
दरम्यान, भाजपने काही संस्थांकडून सर्वेक्षण केले असे युती किंवा स्वबळावर लढूनही १६०हून अधिक जागा भाजपला मिळतील आणि युतीला २४० जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भाजपला १६० पेक्षा एकही जागा कमी मिळणार नाही, उलट वाढतील, आमची पूर्ण तयारी आहे, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
शहा यांच्यासमोर निश्चित झालेले सूत्र अंतिम ; जागावाटपाबाबत संजय राऊत यांचा दावा
नाशिक : लोकसभा निवडणुकीवेळी युतीची घोषणा करतांना भाजपचे अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीसाठी जागा आणि सत्ता वाटपाचा ५०-५० असे जे सूत्र जाहीर झाले होते, तोच अखेरचा प्रस्ताव असल्याचा दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. जागा वाटपाविषयी भाजप नेत्यांकडून वेगवेगळे प्रस्ताव मांडले जात आहेत. हे प्रस्ताव माध्यमात असून भाजपचा तसा कोणताही प्रस्ताव शिवसेनेकडे आला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, बुधवारी राऊत यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. जिथे विद्यमान आमदार आहेत, त्या जागा त्या त्या पक्षांकडे ठेऊन उर्वरित जागांचे निम्मे-निम्मे वाटप करण्याचा नवीन प्रस्ताव भाजप नेते मांडत असल्याकडे लक्ष वेधले असता राऊत यांनी लोकसभा निवडणुकीवेळी भाजपच्या अध्यक्षांसमोर निश्चित झालेले सूत्र अंतिम असल्याचे नमूद केले. छगन भुजबळ यांच्या सेना प्रवेशाच्या चर्चेवर त्यांनी भुजबळ यांच्याच विधानाचा संदर्भ दिला. खुद्द भुजबळ हे अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे सांगत असून त्यांच्या मताचा सर्वानी आदर करायला हवा. काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजप-शिवसेनेत येत आहेत. शिवसेनेकडे ‘वॉशिंग मशीन’ नसल्याने आम्हांला माणसे पारखून घ्यावी लागतात, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
आर्थिक मंदीच्या संकटातून बाहेर काढा..
देशातील आर्थिक मंदीमुळे हजारो कामगार बेरोजगार होण्याच्या मार्गावर आहेत. १९९१ मध्ये देशात भयावह स्थिती होती. तेव्हां तत्कालीन अर्थमंत्री, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशाला त्या संकटातून बाहेर काढले. सध्याच्या मंदीतून बाहेर पडण्यासाठी त्यांच्यासह इतर अर्थतज्ज्ञांशी पंतप्रधान आणि भाजपच्या मंत्र्यांनी चर्चा करून तोडगा काढायला हवा. देशावर कोसळलेल्या आर्थिक संकटाची जबाबदारी भाजपची असल्याचेही त्यांनी नमूद केले.