भाजपचे १६२, शिवसेनेचे १२४ उमेदवार
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप-शिवसेना महायुतीचे जागावाटप स्पष्ट झाले असून भाजपने १५२ जागांवर थेट उमेदवार जाहीर करताना रिपब्लिकन पक्ष, रासप, रयत क्रांती, शिवसंग्राम या मित्रपक्षांसाठी १२ जागा सोडल्या. शिवसेनेच्या वाटय़ाला १२४ जागा आल्या.
विशेष म्हणजे सदा भाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या दोन जागांवर भाजपने आपल्याच नेत्यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने १५० जणांची नावे उमेदवार म्हणून जाहीर केली. त्या १५० मतदारसंघांच्या यादीत कणकवली आणि कामटी या मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश नाही. कणकवलीत नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांना तर कामटीमध्ये आयत्या वेळी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याऐवजी टेकचंद सावरकर यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे भाजपतर्फे राज्यात १५२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रासपने जिंतूर व दौंड या दोन मतदारसंघांत आपल्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे. तर वर्सोवामध्ये भारती लव्हेकर व किनवटमध्ये भीमराव केराम हे दोघे या शिवसंग्रामच्या कोटय़ातून भाजपच्या कमळ चिन्हावर लढत आहेत. सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेला भाजपने जागा सोडताना अक्कलकोट, पंढरपूर व या दोन जागा सोडल्या.
या दोन्ही जागा कमळ चिन्हावरच लढवल्या जाणार असून त्यातही अक्कलकोटमध्ये भाजपचे स्थानिक पदाधिकारी सचिन कल्याणशेट्टी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर पंढरपूरमध्ये भाजपशी जोडले गेलेले सुधाकरपंत परिचारक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला भंडारा, नायगाव, पाथरी, माळशिरस, फलटण व मानखुर्द-शिवाजी नगर या सहा जागा सोडण्यात आल्या आहेत.