उमाकांत देशपांडे

मुंबई : भाजप- शिवसेना (शिंदे गट)  यांचे विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप झाले नसून कोणतेही सूत्र ठरले नसल्याचे स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी ‘ लोकसत्ता ‘ शी बोलताना केले.

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप २४० जागा लढविण्याचा विचार करीत असल्याचे वक्तव्य मी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निवडणूक तयारीच्या दृष्टीने मार्गदर्शन करताना आणि सज्ज रहावे, यासाठी केले होते. निवडणुकीच्या वेळी जागावाटपाचा विचार होईल. शिंदे गटाबरोबर असलेल्या आमदारांच्या जागांपेक्षा ज्या आणखी जागा शिंदे गटाकडे जातील, त्यांना भाजपने केलेल्या निवडणूक तयारीचा उपयोगच होईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजप २४० जागा लढणार असल्याचे वक्तव्य बावनकुळे यांनी पक्षाचे प्रवक्ते व अन्य पदाधिकाऱ्यांपुढे बोलताना केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली. शिंदे गटाला ४८ जागाच वाट्याला येणार, याबाबत चर्चा सुरू झाल्याने भाजप नेत्यांनी रात्रीच सारवासारव सुरू केली बावनकुळे यांचे भाषण समाजमाध्यमांवर टाकण्यात आले होते. पण वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त करीत हस्तक्षेप केल्यावर हे भाषण काढून टाकण्यात आले.