मुंबई : मनोज जरांगे-पाटील यांचे नेतृत्व उदयास आल्यापासून त्यांच्याशी वाटाघाटी किंवा समन्वयात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार असायचा. एव्हाना शिंदे यांच्या शब्दाबाहेर जरांगे नाहीत, अशी चर्चा व्हायची. पण मुंबईतील आंदोलनाच्या वेळी जरांगे यांच्याशी वाटाघाटी करण्याच्या मोहिमेपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दूर ठेवण्यात आले होते. तसेच चर्चेसाठी राधाकृष्ण विखे-पाटील यांना पुढे करून भाजपने जरांगे हे ‘प्यादे’ आपल्या हाती राहील याची खबरदारी घेतली आहे.

जरांगे यांच्या पाच दिवसांच्या उपोषणात सरकारच्या वतीने पहिले चार दिवस कोणत्याच मंत्र्याने चर्चा वा वाटाघाटी केल्या नव्हत्या. जरांगे यांचे आंतरवाली सराटी येथील गाजलेल्या उपोषणाच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच मध्यस्थी केली होती. शिंदे यांनी तेव्हा शिवसेनेच्या मंत्र्यांनाच आधी तेथे पाठविले होते. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात जरांगे यांनी मुंबईत येण्याचा निर्धार केला होता. तेव्हा त्यांना मुंबईच्या सीमेवर नवी मुंबईत थोपविण्यात शिंदे यांना यश आले होते. तेव्हाही शिंदे व त्यांच्या निकटवर्तीयांनीच जरांगे यांच्याशी वाटाघाटी केल्या होत्या. शेवटी जरांगे यांचे उपोषण मागे घेण्यासाठी स्वतः शिंदे वाशीत सरकारी आदेशाची प्रत घेऊन गेले होते.

आझाद मैदानातील जरांगे यांचे उपोषण सुरू झाल्यापासून शिंदे हे मुंबई, ठाण्याबाहेरच होते. यंदा शिंदे यांच्या दरे या मूळ गावी गणेशोत्सव होता. गेल्या शुक्रवारपासून शिंदे दरे या गावातच होते. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलनाच्या संदर्भात आयोजित केलेल्या बैठकीला शिंदे उपस्थित होते. त्यानंत शिंदे कुठेच चित्रात नव्हते. जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे म्हणून शिंदे यांनी प्रयत्न केले नाहीत. सारी सूत्रे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे होती. त्यांनी सूचना केली असती तरी शिंदे यांनी काही तरी प्रयत्न केले असते. पण त्यांना काहीही सांगण्यात आले नव्हते, असे शिंदे यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

विखे-पाटील यांच्यावर जबाबदारी

जरांगे यांचे उपोषण सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विखे-पाटील यांच्यावर जबाबदारी टाकली होती. मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष या नात्याने ते अधिकाऱ्यांबरोबर सतत बैठका घेत होते. तसेच जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी विखे-पाटील आझाद मैदानावर गेले होते. सारे श्रेय विखे-पाटील यांना मिळेल, अशी व्यूहरचना करण्यात आली होती. विखे-पाटील व शिवेंद्रराजे भोसले हेच दोघे आघाडीवर होते.

सामंत यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न!

शिंदे सरकारच्या काळात उदय सामंत यांची भूमिका महत्त्वाची असायची. या वेळी सामंत यांना तेवढे महत्त्व देण्यात आले नाही. जरांगे यांचे उपोषण सोडविणे व त्यातून मराठा समाजाची मागणी करण्याचे सारे श्रेय भाजपला मिळेल अशीच व्यूहरचना मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली होती. या सर्व घडामोडींमध्ये जरांगे यांच्यावर प्रभाव टाकण्यात विखे-पाटील व शिवेंद्रराजे भोसले हे भाजपचे दोन मंत्री यशस्वी ठरले. जरांगे यांना भविष्यात हाताळण्यासाठी शिंदे यांची आवश्यकता नाही, असा संदेश भाजपने दिला आहे.