आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला चारी मुंडय़ा चीत करण्यासाठी भाजपने सर्व शक्ती पणाला लावली आहे. अन्य पक्षातील चांगले उमेदवार ‘मनसे’ फोडण्यापर्यंत डावपेच भाजपचे चाणक्य राबवत आहेत. त्याचवेळी मुंबईसाठी पायाभूत विकासाच्या योजना केवळ भाजपच राबवू शकते हे दाखविण्याची जय्यत तयारी सुरू आहे. जवळपास एक लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांची उद्घाटने आगामी काळात भाजपकडून धुमधडाक्यात केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुंबईतील व मुंबईमध्ये येणाऱ्या लाखो प्रवाशांचा विचार करून मुंबई सागरी किनारा मार्ग, कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो प्रकल्प, वांद्रे- विरार उन्नत मार्ग, सीएसटी- पनवेल उन्नत मार्ग तसेच बेस्टचे अध्यक्षपद भाजपकडे आल्यामुळे बेस्टची तोटय़ात असलेली प्रवासी वाहतूक लक्षात घेऊन सुमारे ३०० कोटी रुपये बेस्टला देण्याची योजनाही तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. वेगवेगळ्या परवानग्यांसाठी रखडलेल्या या प्रकल्पांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जातीने घेत असून महापालिका निवडणुकीनिमित्त लागणाऱ्या आचारसंहितेच्या आधी या सर्व प्रकल्पांच्या कामांची उद्घाटने वाजतगाजत केली जातील. मुंबई सागरी किनारा मार्गातील अडथळे दूर करण्यासह या सर्व पायाभूत प्रकल्पांच्या कामांचा नियमित आढावा देवेंद्र फडणवीस घेत असून ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान या कामांची उद्घाटने केली जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सागरी किनारा मार्गाचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेतही सेना-भाजप युती होणार की नाही हे स्पष्ट नसले तरी अधिकृतपणे काडीमोड झाल्याची घोषणा सेना-भाजपने केलेली नाही. मात्र गेले वर्षभर मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपची वेगवेगळ्या मुद्दय़ांवर जोरदार खडाजंगी सुरू आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी वेळोवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच थेट निशाणा केल्यानंतर महापालिकेत सेनेला अडचणीत आणण्याचे सर्व उद्योग भाजपच्या नगरसेवकांकडून केले जात आहेत. रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचारापासून नालेसफाईच्या गाळापर्यंत एकमेकांवर जोरदार चिखलफेक करण्याचे काम शिवसेना-भाजपने कले. विकास कामांवर पकड ठेवायची अशी भाजपची रणनीती असून वांद्रे-विरार उन्नत मार्ग, मुंबई सागरी किनारा मार्ग, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, सीएसटी-पनवेल उन्नत मार्ग आदी सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या कामांची उद्घाटने करून शिवसेनेवर वरचष्मा मिळविण्याची तयारी भाजपने चालवली आहे.
- वांद्रे-विरार उन्नत मार्ग-किंमत २५००० कोटी
- सीएसटी-पनवेल उत्तन मार्ग- किंमत २५००० कोटी
- मुंबई सागरी महामार्ग- किंमत ११००० कोटी
- मुंबई ट्रान्स हार्बर लिंक १५००० कोटी
- कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो- किंमत २६००० कोटी
