मुंबई : रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची आधीची सहा हजार कोटींची कामे आधीच रखडलेली असताना उर्वरित आणखी चारशे किमीच्या रस्त्यांच्या कामांसाठी निविदा काढण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली आहे. या कामाच्या निविदांसाठी मसुदा तयार केला जात असून येत्या तीन आठवडयात निविदा काढण्यात येणार आहेत. या कामासाठी सुमारे सात हजार कोटींचा खर्च अंदाजित आहे. तर शहर भागातील वादग्रस्त रस्ते कंत्राटदाराला सुनावणीसाठी या आठवड्यातील वेळ दिली जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>> कोकण रेल्वेवर ब्लॉक; तीन रेल्वेगाड्यावर परिणाम
येत्या दोन वर्षात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा संकल्प सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला सर्व रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्याचे निर्देश दिले होते. ६,०७८ कोटींच्या कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यातून पाच नामांकित कंत्राटदारांची निवड करण्यात आली व जानेवारी महिन्यात कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले. जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रस्त्याच्या कामांचे भूमीपूजन करण्यात आले होते. ही रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. तसेच शहर भागातील रस्ते कंत्राटदाराने एकही काम सुरू न केल्यामुळे त्याचे कंत्राट रद्द करण्यात आले व हे प्रकरण सध्या न्यायालयात गेले आहे. अशी स्थिती असताना पालिकेने आता आणखी ४०० किमीच्या रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणासाठी निविदा मागवण्याची तयारी सुरू केली आहे. येत्या तीन आठवड्यात निविदा मागवण्यात येणार आहेत. लोकसभेच्या निवडणूकीआधी उर्वरित रस्ते कंत्राटे देऊन त्याचे भूमीपूजन करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा >>> सिकलसेलच्या रुग्णांमध्ये तीन वर्षांत मोठी वाढ!
दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडत असल्यामुळे पालिकेने रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्याचा दीर्घ कालीन कार्यक्रम हाती घेतला होता. त्या अंतर्गत दरवर्षी टप्प्याटप्प्याने रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटीकरण केले जात होते. मुंबई एकूण सुमारे २००० किमीचे रस्ते असून त्यापैकी पन्नास टक्के रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. तर २०२१-२२ या आर्थिक वर्षात पालिकेने २३६ किमीची २२०० कोटींची कामे हाती घेतली होती. पालिकेची मुदत संपण्याआधी या कामांना मंजूरी देण्यात आली होती. ही कामे ऑक्टोबर २०२२ पासून सुरू झाली होती. ती कामे अद्यापही सुरू आहेत. त्यातच राज्यात गेल्यावर्षी सत्तापालट झाल्यानंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये पुन्हा एकदा ३९७ किमीच्या ९१० रस्त्यांच्या कामांसाठी ६,०७८ कोटींच्या म्हणजेच प्रथमच मोठ्या प्रमाणावर निविदा मागवण्यात आल्या होत्या. मात्र ही वर्ष संपत आले तरी ही कामे सुरूच न झाल्यामुळे मोठा वाद झाला होता.
शहर भागातील कंत्राटदाराला सुनावणीसाठी बोलवणार
शहर भागात तर एकाही रस्त्याचे काम सुरू न झाल्यामुळे कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आली होती व त्याचे कंत्राटही रद्द करण्यात आले होते. त्यामुळे नव्या निविदेतील शहर भागातील रस्त्यांची कामे ठप्प आहेत. या कंत्राटदाराने न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने कंत्राटदाराची सुनावणी घेऊन त्याचे म्हणणे ऐकून घ्यावे असे आदेश पालिका प्रशासनाला दिले आहेत. त्याकरीता ३१ जानेवारीची मुदत दिली आहे. या सुनावणीसाठीचा प्रस्ताव पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे पाठवण्यात आला असून आठवड्याभरात अधिकाऱ्यांची त्याकरीता नेमणूक होईल व सुनावणी घेतली जाईल, अशी प्रतिक्रिया अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी दिली.
मुंबईतील एकूण रस्ते ..सुमारे २००० किमी
सन २०२२ पूर्वी मुंबईत साधारण ९९० कि.मी. रस्त्यांचे सिमेंट कॉक्रिटीकरण झालेले आहे. जानेवारी २०२२ ते मे २०२३ दरम्यान एकूण १५८ कि.मी.रस्त्यांचे सिमेंट कॉक्रिटीकरण करण्यात आले आहे.
अशाप्रकारे मुंबईत एकूण ११४८ कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट कॉक्रिटीकरण झालेले आहे.
२०२३-२४ मध्ये ३९७ किमी रस्त्यांसाठी कंत्राट दिले आणखी ४०० किमी च्या कामांसाठी कंत्राट देण्यात येणार आहे.