लससाठय़ाअभावी पालिकेवर नामुष्की; नागरिकांना उत्तरे देताना नगरसेवक हैराण

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : करोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम विस्तारण्यासाठी तसेच अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करून करोनाचा धोका कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने शहरातील २२७ प्रभागांत प्रत्येकी एक लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, लससाठा उपलब्ध होत नसल्यामुळे दोन दिवसांपूर्वी सुरू केलेली ही केंद्रे बंद करावी लागली आहेत.

मुंबईमध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांना करोना प्रतिबंध लस देण्यासाठी शासकीय, पालिका आणि काही खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली. मुंबईतील लोकसंख्या लक्षात घेत लसीकरण केंद्रांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आली. त्यानंतर १ मेपासून १८ ते ४५ वयोगटांतील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले. लसीकरण केंद्रांची संख्या कमी पडण्याची शक्यता लक्षात घेत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी पालिकेच्या २२७ प्रभागांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे २२७ लसीकरण केंद्र सुरू करण्याची घोषणा केली. या लसीकरण केंद्रांची तातडीने उभारणी करण्याचे आदेशही दिले.

आयुक्तांनी आदेश देताच प्रत्येक प्रभागांमध्ये लसीकरण केंद्र उभारण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या केंद्रांसाठी तातडीने जागा निश्चित करण्यात आल्या. मंडप उभारुन लसीकरणासाठी आवश्यक त्या सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या. डॉक्टर आणि अन्य आवश्यक कर्मचाऱ्यांनाही तेथे तैनात करण्यात आले. पालिकेच्या आर-उत्तर विभाग कार्यालयाच्या हद्दीतील दहिसरमधील प्रभाग क्रमांक १ आणि ७ मध्ये दोन लसीकरण केंद्रांचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन समयी या दोन्ही लसीकरण केंद्रांना लसीच्या प्रत्येकी २०० मात्राही उपलब्ध करण्यात आल्या.

या दोन्ही केंद्रांमध्ये सोमवारी आणि मंगळवारी एकूण ४०० नागरिकांना लस देण्यात आली. त्यानंतर केंद्रातील लस साठा संपुष्टात आला. त्यामुळे लससाठा मिळेपर्यंत केंद्रातील लसीकरण बंद ठेवावे लागेल ही बाब अधिकाऱ्यांनी नगरसेवकांच्या कानावर घातली आणि नगरसेवकांचा संताप झाला. आश्चर्याची बाब म्हणजे ‘आर-उत्तर’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील तीन प्रभागांमधील लसीकरण केंद्रांचे मंगळवारी उद्घाटन करण्यात आले. या केंद्रांनाही लसीच्या प्रत्येकी २०० मात्रा देण्यात आल्या. बुधवारीही आणखी एका प्रभागामधील लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

लससाठय़ाअभावी प्रभागनिहाय लसीकरण केंद्र बंद करावे लागत असल्यामुळे अधिकारी हतबल झाले आहेत. तर केंद्रात लसीकरण होणार नसल्याचे कळताच नागरिक नगरसेवकांना जाब विचारू लागले आहेत. पुरेसा

लससाठा उपलब्ध नसताना ही केंद्र सुरू करण्याची घाई का करण्यात येत आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. उद्घाटन केलेले केंद्र सुरू राहावे यादृष्टीने प्रशासनाने नियोजन करायला हवे होते. सोमवारी उद्घाटन केलेली केंद्रे बुधवारी बंद ठेवावी लागणार आहेत. तर मंगळवारी उद्घाटन झालेल्या केंद्रांमधील लसीकरण गुरुवारी बंद ठेवावे लागणार आहे. यामुळे लसीकरण मोहिमेचा खेळखंडोबा होत असल्याचा आरोप नगरसेवकांकडून होऊ लागला आहे. तर वरिष्ठ पातळीवरुन आलेल्या आदेशानुसार ही केंद्रे सुरू करण्यात येत असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.