मुंबई : मुंबईमध्ये गेल्या काही वर्षांपासून टप्प्याटप्प्याने रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण केले जात आहे. मुंबईतील एकूण दोन हजार किमी लांबीच्या रस्त्यांपैकी दीड हजार किमी लांबीच्या रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण आतापर्यंत पूर्ण झाले आहे. आता केवळ ४०० किमी रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण बाकी असून खड्डेमुक्त रस्त्यांसाठी मुंबईकरांना अजून एक दीड वर्ष वाट बघावी लागणार आहे.
येत्या दोन वर्षात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा संकल्प सोडत माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये पालिका प्रशासनाला सर्व रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ६,०७८ कोटींच्या कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यातून पाच नामांकित कंत्राटदारांची निवड करण्यात आली व जानेवारी २०२३ मध्ये कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले. ही कामे पूर्ण झालेली नसतानाच दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठीही निविदा मागवून ऑगस्ट २०२४ मध्ये कार्यादेश दिले.
पहिल्या टप्प्यातील अर्धवट कामे आणि दुसऱ्या टप्प्यातील नवीन कामे ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झाली होती. या कामांपैकी ४९ टक्के कामे पूर्ण झाल्याचे नुकतेच पालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. पावसाळा सुरू झाल्यामुळे सध्या चार महिन्यांसाठी रस्त्यांची कामे थांबवण्यात आली आहेत. आता उर्वरित कामे ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणार आहेत.
पहिल्या टप्प्यातील कामांना जानेवारी २०२३ मध्ये सुरूवात झाली होती. ही कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यातच दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठीही निविदा मागवून ऑगस्ट २०२४ मध्ये कार्यादेश दिले. पहिल्या टप्प्यातील अर्धवट कामे आणि दुसऱ्या टप्प्यातील नवीन कामे ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झाली होती. दुसऱ्या टप्प्यातील कामे जून २०२७ पर्यंत चालणार आहेत. त्यामुळे खड्डेमुक्त रस्त्यांसाठी मुंबईकरांना अजून एक दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे.
मुंबईतील ७६ टक्के रस्ते कॉंक्रीटचे
मुंबई महापालिकेने गेल्या काही वर्षांपासून टप्प्याटप्प्याने रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला होता. राज्यात सत्तापालट होण्यापूर्वी मुंबईतील १२२४ किमी लांबीच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन टप्प्यात ज्या महानिविदा काढण्यात आल्या, त्यातील ३४३ किमी लांबीची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे संपूर्ण मुंबईतील सुमारे १५६६ किमी लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटकरण आतापर्यंत पूर्ण झाले आहे. मुंबईतील एकूण रस्त्यांची लांबी २०५० किमी असून त्यापैकी ७६ टक्के रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण पूर्ण झाले आहे.
पहिल्या टप्प्यातील कामांना मे २०२६ ची मुदत
पहिल्या टप्प्यातील कामांना जानेवारी २०२३ मध्ये सुरुवात झाली होती. मात्र शहर भागातील कंत्राटदाराने कामे रखडवल्यामुळे या टप्प्यातील कामे चांगलीच रखडली आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी आधी मे २०२५ ची मुदत ठरवली होती. मात्र ३१ मेपर्यंत केवळ ६३ टक्के काम होऊ शकले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील कामे मे २०२६ मध्ये पूर्ण होतील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.
आधीचे कॉंक्रीटीकरण झालेले रस्ते – १२२४ किमी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील कॉंक्रीटीकरण झालेले रस्ते – ३४२ किमी एकूण – १५६६ किमी पूर्ण