मुंबई : लोअर परळच्या कमला मिल परिसरात मुंबई महापालिकेने एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा कारवाई केली. कमला मिलमधील ‘लिव्हिंग लिक्विडस्’ या आस्थापनेतील अनधिकृत बांधकाम निष्कासित करून त्यांच्या उपाहारगृहांचे दोन्ही परवाने रद्द करण्याची कारवाई मुंबई महानगरपालिकेने मंगळवार, ५ ऑगस्ट रोजी केली. तळमजला आणि पहिल्या मजल्यावर कपड्याच्या दुकानाऐवजी उपाहारगृह, बार, वाईन शॉप आणि तळमजल्यावर टेलरिंग दुकानाऐवजी उपाहारगृह असा बदल करून अनधिकृतरितीने चालवत असल्यामुळे मुंबई महापालिकेने ही कारवाई केली आहे.
कमला मिल परिसरातील आयटी पार्कच्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण, तसेच अनधिकृतरित्या रेस्टॉरंट, पब आणि बार सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी स्थळ निरिक्षण करून कारवाई करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले होते. त्यानुसार गेल्याच आठवड्यात ३१ जुलै रोजी कमला मिल परिसरातील ‘थिओब्रोमा’, ‘मॅकडोनाल्ड्स’, ‘शिवसागर हॉटेल’, ‘नॅनो’ज कॅफे’, ‘स्टारबक्स’, ‘बीरा टॅप्रूम’, ‘टोस्ट पास्ता बार’ (फूड बाय देविका) व ‘बीकेटी हाऊस’ या ठिकाणी पाडकाम व जप्तीची कारवाई करण्यात आली.
ही धडक कारवाई मोहीम पुढे सुरू ठेवत महानगरपालिकेने ४ आणि ५ ऑगस्ट रोजी कमला मिल परिसरातील ‘लिव्हिंग लिक्विडस्’ (मुंबई वाईन्स अँड ट्रेडर्स) या आस्थापनेची संयुक्त पाहणी केली. या ठिकाणी तळमजला आणि पहिल्या मजल्यावर कपड्याच्या दुकानाऐवजी रेस्टॉरंट बार व वाईन शॉप आणि तळमजल्यावर टेलरिंग शॉपऐवजी रेस्टॉरंट आणि डायनिंग, असे रूपांतर केल्याचे आढळून आले.
तसेच, चटईक्षेत्र नियमांचे उल्लंघन करून उघड्या जागेवर आच्छादन आणि गच्चीवर अनधिकृत छत निर्माण केल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे, तेथे अनधिकृतरित्या भिंत बांधणे, परस्पर प्रयोजन बदलून शीतगृह बांधणे, दरवाज्याच्या रचनेत परस्पर बदल करणे, लाकडी आणि काचेच्या भिंती उभारणे यांसह विविध बांधकाम अनियमितता, अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण आढळले.
डॉ. अश्विनी जोशी यांच्या निर्देशांनुसार, उपायुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे, जी (दक्षिण) विभागाच्या सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या या संयुक्त कारवाईत मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य, इमारत व कारखाना आणि बांधकाम प्रस्ताव विभाग तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
काम थांबवण्याची नोटीस
या स्थळ निरीक्षणाच्या आधारे ‘लिव्हिंग लिक्विडस्’ला (मुंबई वाईन्स अँड ट्रेडर्स) सोमवार, ४ ऑगस्ट रोजी काम थांबवण्याची (स्टॉप वर्क) नोटीस बजावण्यात आली होती. तर, मंगळवार, ५ ऑगस्ट रोजी त्यांच्यावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. तसेच, व्यावसायिक क्षेत्राचा अनधिकृत विस्तार व अनिवार्य अग्निसुरक्षा प्रमाणपत्र न घेता सार्वजनिक सुरक्षिततेला धोकादायक अशा पद्धतीने संचालन केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेकडून ‘लिव्हिंग लिक्विडस्’च्या दोन्ही उपाहारगृहांचे परवानेही रद्द करण्यात आले.