मुंबई : लोअर परळ येथील कमाल मिल परिसरात मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयाने अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. कमला मिल परिसरात वाहनतळासाठी अनधिकृतपणे उभारण्यात आलेली संरक्षक भिंत, मोकळ्या जागेतील शेडचे निष्कासन करण्यात आले. तसेच, परवाना अटींचे उल्लंघन करणाऱ्या दोन खाद्यपदार्थांच्या दुकानांवर जप्तीची कारवाई करण्यात आली.

मुंबई महानगरपालिकेच्या जी (दक्षिण) विभागाच्या वतीने महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या सहाय्याने कमला मिल परिसरात गुरुवारी संयुक्त कारवाई करण्यात आली. जी (दक्षिण) विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या या संयुक्त कारवाईत मुंबई अग्निशमन दल, इमारत व कारखाने, आरोग्य, अतिक्रमण निर्मूलन आणि परिरक्षण विभागातील अधिकारी तसेच कर्मचारी सहभागी झाले होते. या संयुक्त कारवाईत कमला मिल परिसरातील थिओब्रोमा रेस्टॉरंट, मॅकडोनाल्डस्, शिवसागर हॉटेल, नॅनो’ज कॅफे, स्टारबक्स, बिरा टॅप्रुम, फूड बाय देविका या दुकानांची तपासणी करण्यात आली. दरम्यान, परवाना अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी बिरा टॅप्रुम आणि फूड बाय देविका या दुकानांवर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जप्तीची कारवाई करण्यात आली.

तसेच, बीकेटी हाऊससमोर वाहनतळासाठी अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंतीसह बिरा ट्रॅपुम आणि फूड बाय देविका यांनी मोकळ्या जागेत उभारलेले अनधिकृत शेड आणि संरक्षक भिंत तोडण्यात आली.मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या निर्देशांनुसार, उपायुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे, जी दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कमला मिलमधील अनधिकृत बांधकामे नेहमीच चर्चेत असतात. २०१७ मध्ये कमला मिलमधील एका उपाहारगृहात आग लागल्यानंतर या संकुलातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा गंभीर बनला होता. या संकुलात मोठ्या प्रमाणावर उपाहारगृह व पब्ज आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्यात मोठी स्पर्धा असते. तसेच अतिशय लहान जागेत अनधिकृत बांधकामे करून उपाहारगृहे चालवली जातात. तसेच रात्रीच्या वेळी या परिसरात श्रीमंतांच्या गांड्यांची मोठी वर्दळ असते. कमला मिलमधील आगीनंतर मुंबईतील उपाहारगृहे व पब्जमधील अनधिकृत बांधकामे हटवण्याची कारवाई मोठ्या प्रमाणावर करण्यात आली होती.