मुंबई : मुंबई महानगरपालिकेने मुंबईत रस्ते कॉंक्रीटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला असून पावसाळ्यामुळे थांबलेली ही कामे येत्या १ ऑक्टोंबरपासून पुन्हा सुरू होणार आहेत. मात्र यावेळी मुंबई महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी रस्ते कॉंक्रीटीकरणाची इत्यंभूत माहिती देणारा डॅशबोर्डे तयार केला आहे. त्यामुळे नागरिकांना आपापल्या विभागातील रस्त्यांची कामे कधी सुरू होणार, काम कुठपर्यंत आले आहे, रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार याबाबतची संपूर्ण माहिती मिळू शकणार आहे. एवढेच नव्हे, तर यंदाचा पावसाळा संपल्यानंतर कोणत्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण हाती घेतले जाणार आहे, त्यांची कामे पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागेल, याचेही अंदाजित वेळापत्रक पाहता येणार आहे.
मुंबई महापालिकेने गेल्या काही वर्षांपासून रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. यामध्ये टप्प्याटप्प्याने रस्ते कॉंक्रीटीकरण केले जात आहे. रस्ते कॉंक्रीटीकरणाची कामे संपूर्ण मुंबईभर सुरू असून या कामांमुळे पावसाळ्यापूर्वी नागरिकांना खूप त्रास सोसावा लागला होता. अनेक ठिकाणी रहिवाशांना इमारतीतून बाहेर पडणे मुश्कील झाले होते. काही इमारतींच्या आजूबाजूचे सगळे रस्ते एकाच वेळी खोदून ठेवले होते. या सगळ्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सोसावा लागला होता.
रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाच्या कामामुळे होणाऱ्या या त्रासाबद्दल विधि मंडळाच्या अधिवेशनातही मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे पालिकेवर खूप मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. पावसाळ्यामध्ये रस्ते कॉक्रीटीकरणाची कामे बंद ठेवण्यात येतात. तर १ ऑक्टोबरपासून ही कामे पुन्हा सुरू होणार आहेत. मात्र यावेळी या कामांमध्ये पारदर्शकता आणण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. रस्त्यांच्या कामांची इत्यंभूत माहिती देण्यासाठी एक डॅशबोर्ड तयार करण्यात आला आहे. त्यावर नागरिकांना आपल्या परिसरातील रस्त्यांच्या कामाची इत्यंभूत माहिती मिळू शकणार आहे.
कुठे पाहता येणार रस्त्यांच्या कामांची माहिती ?
रस्ते काँक्रीटीकरण कामांच्या ताज्या घडामोडींची माहिती देण्यासाठी महानगरपालिकेने https://roads.mcgm.gov.in/publicdashboard/ ही विशेष लिंक सुरू केली आहे. या डॅशबोर्डवर परिमंडळनिहाय व विभागनिहाय रस्ते काँक्रीटीकरणाची प्रगती पाहता येईल. पावसाळ्यापूर्वी पूर्ण झालेली कामे, सुरू असलेली कामे, तसेच कामे सुरू न झालेल्या रस्त्यांची माहिती यामध्ये उपलब्ध आहे. काँक्रीटीकरणाच्या कामाच्या प्रगतीची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous संकेतस्थळावर काँक्रीटीकरण प्रकल्पामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व रस्त्यांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. संकेतस्थळावर ‘नागरिकांकरीता’ (For Citizens), त्यात ‘स्थिती जाणून घ्या’ (Check Status) मधील ‘Mega CC Road Works Progress’ या लिंक वर जाऊन माहिती पाहता येईल.
परिमंडळनिहाय व विभागनिहाय पूर्ण झालेले रस्ते, पावसाळ्यापूर्वी अंशतः पूर्ण झालेले रस्ते, तसेच अजून काम सुरू न झालेल्या रस्त्यांच्या माहितीचा त्यात समावेश आहे. पावसाळ्यापूर्वी अंशतः पूर्ण झालेले रस्ते, तसेच अजून सुरू न केलेल्या रस्त्यांचे काम या पावसाळ्यानंतर कधी सुरू होणार याची माहिती, तसेच या रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण होण्याचा अंदाजित कालावधी याचे वेळापत्रक संकेतस्थळावर देण्यात आले आहे. https://roads.mcgm.gov.in/publicdashboard/ या डॅशबोर्डवर एखाद्या विशिष्ट रस्त्याची माहिती त्या रस्त्याच्या नावाने शोधण्याची सुविधादेखील उपलब्ध आहे. तसेच ‘मॅप’ वर रस्ता शोधून त्यास ‘क्लिक’ केल्यावर देखील माहिती मिळू शकते.
काँक्रीटीकरण कामाच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता रहावी यासाठी महानगरपालिकेकडून हे पाऊल उचलले जात आहे. रस्त्यांच्या कामांबाबत लोकांच्या मनात संभ्रम राहू नये. तसेच लोकांना या कामांविषयी खात्री असावी याकरीता हा उपक्रम आहे. तसेच काम कधी पूर्ण होणार याची तारीख प्रत्येक रस्त्याबाबत जाहीर केलेली असल्यामुळे पालिका प्रशासनावरही त्याचा आपसूकच दबाव राहणार आहे. ही कामे सुरू असताना नागरिकांना असुविधा होणार नाही, अशाप्रकारे ही कामे करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न राहील. रस्ते कामांची गुणवत्ता अत्युच्च दर्जाची राहील, याबाबत कोणाचीही हयगय केली जाणार नाही. – अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प)