मुंबई : कबुतरांना खाऊ घालणाऱ्यांविरोधात फौजदारी तक्रारी दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यामुळे मुंबई महापालिकेच्या कारवाईला बळ मिळाले आहे. कबुतरांना खाद्य देणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मुंबई महापालिकेने आधीच कर्मचारी तैनात केले असून त्यांच्या मदतीला आता पोलिसांचे पथकही तैनात करण्यात येणार आहे. कबुतरखान्यावरील घुमट आधीच पालिकेने हटवलेले होते, त्यातच आता कबुतरखान्यांमध्ये खाद्य देणे बंद झाल्यामुळे कबुतरे परिसरात सैरावैरा उडत आहेत. त्यामुळे परिसरातील दुकानांच्या छतावर, झाडांवर, इमारतींवर कबुतरांचे थवेच्याथवे बसलेले दिसत आहेत.
कबुतरखाने बंद करण्यासाठी मुंबई महापालिकेने तत्काळ मोहीम राबवावी असे निर्देश राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात दिले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेने दुसऱ्याच दिवशी दादरच्या सुप्रसिद्ध कबुतरखान्यावर कारवाई केली होती. कबुतरखान्यावरील अनधिकृत बांधकाम हटवले, तसेच कबुतरांसाठी जमा केलेले खाद्यही हटवले. पालिकेच्या या कारवाईच्या विरोधात काही पक्षीप्रेमींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने वरील आदेश दिले. कबुतरांना खाऊ घालणाऱ्या आणि याप्रकरणी कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणणाऱ्या व्यक्तिविरोधात फौजदारी तक्रारी दाखल करा, असे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी महापालिकेला दिले. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या कारवाईला बळ मिळाले आहे.
दरम्यान, कबुतरांना खाद्य देणे बंद झाल्यामुळे या परिसरातील कबुतरे गेल्या काही दिवसांपासून विखुरली आहेत. कबुतरखान्यावरील घुमटही गेल्यामुळे कबुतरांचे थवे आसपासच्या परिसरात सैरावैरा फिरत आहेत. कबुतरखाना बंद झाल्यानंतर ही कबुतरे इथून जाण्यास थोडा वेळ लागेल, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
खाद्य घालणाऱ्यांना ५०० रुपये दंड
रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी प्राणी – पक्षांना खाऊ घालणाऱ्यावर दंडात्मक कारवाईची तरतूद मुंबई महापालिकेच्या घनकचरा कायद्यातील स्वच्छता व आरोग्य उपविधीच्या नियमावलीत आधीपासून आहे. त्यात कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी खाद्य घालणाऱ्यांकडून पाचशे रुपये दंड वसूल करण्याची तरतूद आहे. कबुतरांना खाद्य घालणाऱ्यांना दंड करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण विभाग कार्यालयाने कबुतरखान्याजवळ पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पथक तैनात केले आहे. मात्र अनेक नागरिक या कर्मचाऱ्यांना दाद देत नाहीत. त्यामुळे उच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.
पालिका आणि पोलिसांची संयुक्त पाहणी
उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही पोलिसांसह कबुतरखान्याची संयुक्त पाहणी केली. पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पथक कबुतरखान्याजवळ आधीपासूनच आहे. मात्र अनेकदा कबुतरांना खाद्य घालायला आलेल्यांना दंड केला की ते पालिकेच्या कर्मचाऱ्यांशीच वाद घालतात. त्यामुळे आता आम्हाला पोलिसांची मदत घ्यावी लागणार असून त्यादृष्टीनेच आज पाहणी करण्यात आली. लवकरच पोलिसांचे पथकही या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे. तसेच या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांचे पथकही तेथे तैनात असेल, अशी पालिकेच्या जी उत्तर विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांनी दिली.
न्यायालयाच्या आदेशाचा फलक लावणार
कबुतरांना खाद्य घातल्यास दंडात्मक कारवाईचा फलक आधीपासून मुंबई महापालिकेने या ठिकाणी लावला आहे. मात्र गुरुवारच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने आता आदेशाबाबतची माहिती देणारा फलक नव्याने लावण्याचे ठरवले आहे. दंडात्मक कारवाईला विरोध करणाऱ्यांवर कोणत्या कलमांतर्गत फौजदारी तक्रारी दाखल केल्या जातील त्याचीही माहिती या फलकात दिली जाणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.