मालाड पूर्व येथे बेकायदेशिररित्या १,१६५ झाडांची कत्तल केल्याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेने दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी नुकतेच दोन गुन्हे दाखल केले आहेत. एका प्रकरणात ५६० व दुसऱ्या प्रकरणात ६०५ झाडांची कत्तल केल्याची तक्रार करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा >>> मुंबई: नवजात बालिकेला टाकून पळालेल्या मातेचा शोध घेण्यात पोलिसांना यश; लैंगिक अत्याचारातून बाळाचा जन्म

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागातील कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून याप्रकरणी ‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिल्या तक्रारीनुसार, मालाड (पूर्व) येथील आयटी पार्कजवळील भूखंडावरील ५६० झाडे बेकायदेशीरपणे तोडण्यात आली आहेत. जून २०२२ मध्ये ही वृक्षतोड झाली होती. मुंबई महानगरपालिकेने याबाबत २९ जून रोजी सर्वेक्षण केले होते. सर्वेक्षणात तेथील ५६० झाडांची कत्तल करण्यात आल्याचे उघड झाले. याप्रकरणी रविवारी दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित ठिकाणाचे मालक व बांधकाम कंपनीच्या विरोधात मुंबई महानगरपालिकेने तक्रार केली होती. दुसऱ्या प्रकरणात इन्फिनिटी आयटी पार्कशेजारी ३१० साग, २१८ शेवर, ७७ पळस अशा एकूण ६०५ झाडांची कत्तल करण्यात आल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. याबाबत २०१८ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. या संदर्भात करण्यात आलेल्या तक्रारीवरून दिंडोशी पोलिसांनी रविवारी ‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५’अंतर्गत गुन्हा दाखल केला. संबंधित ठिकाणाचे मालक व बांधकाम कंपनीविरोधात मुंबई महानगरपालिकेने तक्रार केली होती. याप्रकरणी पुढील तपास करण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.