महापालिका रुग्णालयात हाताच्या प्रत्यारोपणाची चाचपणी

घाटकोपर रेल्वे स्थानकावरील अपघातात हात गमावलेल्या मोनिका मोरे हिला कृत्रिम हातांमुळे पुन्हा नव्याने आयुष्य जगण्याची संधी मिळाली.

घाटकोपर रेल्वे स्थानकावरील अपघातात हात गमावलेल्या मोनिका मोरे हिला कृत्रिम हातांमुळे पुन्हा नव्याने आयुष्य जगण्याची संधी मिळाली. मात्र रेल्वे अपघात तसेच इतर दुर्घटनांमध्ये दर वर्षी हात गमावणारे शेकडो जण अजूनही हातांच्या प्रतीक्षेत आहेत. कृत्रिम हस्तरोपणाचा प्रयोग काही प्रमाणात यशस्वी होत असला तरी मूत्रपिंड, यकृत, नेत्र याप्रमाणे नैसर्गिक हातांचेही प्रत्यारोपण पालिका रुग्णालयात करता येईल का याची चाचपणी राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्ताने होत आहे. देशातील पहिली हस्त प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणारे डॉ. सुब्रमण्यम अय्यर आज, शुक्रवारी केईएम येथे याबाबत मार्गदर्शन करणार असून अपंगांसाठी काम करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधी व सामान्यांमध्येही याबाबत जागृती करण्याचा उद्देश यामागे आहे.
एकीकडे या अवयवदानासंबंधी जागृती सुरू असतानाच आणखी एक पाऊल पुढे टाकत आता हातांच्या प्रत्यारोपणासंबंधी चर्चा सुरू झाली असून अवयवदान दिनाच्या निमित्ताने आज शुक्रवारी दुपारी एक ते तीन या वेळेत केईएम रुग्णालयात कोची येथील डॉ. सुब्रमण्यम अय्यर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कोची येथील अमृता आरोग्य विज्ञान संस्थेचे प्राध्यापक डॉ. सुब्रमण्यम अय्यर यांनी जानेवारी २०१५ मध्ये देशातील पहिली हस्त प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली. फ्रान्समध्ये १५ वर्षांपूर्वी पहिल्यांदा हा प्रयोग करण्यात आला होता. त्यानंतर अमेरिका तसेच अनेक युरोपीय देशांमध्ये अशा शस्त्रक्रियांना सुरुवात झाली. या शस्त्रक्रियांना सुरुवातीला जोरदार विरोध झाला होता. मात्र अवयवदानाप्रमाणेच या शस्त्रक्रियांची उपयुक्तता लक्षात आल्याने त्याला पाठिंबा मिळत आहे.
शहरात रेल्वे तसेच रस्ता अपघातात अनेकांना हात-पाय यासारखे अवयव गमवावे लागतात व आयुष्यभर अपंगत्व येते. कृत्रिम अवयवाऐवजी नैसर्गिक अवयवांचा उपयोग केल्यास त्याचा किती अधिक लाभ होईल, शस्त्रक्रियेची यशस्विता, त्यासाठी आयुष्यभर घ्यावी लागणारी औषधे, खर्च यासोबतच लोकांमध्ये यासंबंधी जनजागृती करण्याच्या उद्देशाने डॉ. अय्यर यांना निमंत्रित करण्यात आले, असे विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या समन्वयक डॉ. सुजाता पटवर्धन यांनी सांगितले. सर्वसामान्यांच्या मनातील प्रश्न तसेच अपंगांसाठी काम करणाऱ्या संस्थांच्या समस्या समजून त्यातून अवयवदानात हे पुढचे पाऊल उचलले जाणार आहे.
मेंदू मृत झालेल्या व्यक्तीकडून अवयवदानाच्या मोहिमेला गेल्या काही वर्षांत गती मिळाली आहे. २०११ पासून आतापर्यंत शहरातील सार्वजनिक व खासगी रुग्णालयातून २५६ मूत्रिपड, १३६ यकृत, चार हृदय आणि दोन फुफ्फुसे याप्रमाणे एकूण ३९८ अवयवांचे प्रत्यारोपण विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या माध्यमातून करण्यात आले. मात्र अजूनही २७३७ जण अवयवदानाच्या प्रतीक्षायादीवर आहेत. यात २५६५ मूत्रपिंडे, १५५ यकृत, १५ हृदय व दोन फुप्फुसांच्या प्रतीक्षेत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bmc hospital test to join artificial han