डास प्रतिबंधक उपाययोजना आणि बांधकाम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याची काळजी न घेणाऱ्या मुंबईमधील ३२ विकासकांवर पालिकेने ‘काम बंद’ करण्याची नोटीस बजावली आहे. त्यात मालाड परिसरातील १९ विकासकांचा समावेश आहे.
मुंबईमध्ये लेप्टोस्पायरोसिस आणि स्वाइन फ्लूच्या साथीचा प्रादुर्भाव होऊ लागल्यामुळे पालिका सतर्क झाली असून ठिकठिकाणी युद्धपातळीवर डास प्रतिबंधक उपाययोजना केल्या जात आहेत. मुंबईमध्ये सध्या मोठय़ा प्रमाणावर इमारतींच्या पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. बांधकामस्थळी साचणाऱ्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होत असल्याचे व तेथे काम करणाऱ्या कामगारांमुळे साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होत असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे बांधकामस्थळी पाणी साचू देऊ नये, डास प्रतिबंधक उपाययोजना करावी व कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आदेश पालिकेने २७४१ ठिकाणी विकासकामे करणाऱ्या विकासकांना केली होती.