मुंबई : प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघनप्रकरणी महापालिकेच्या एच पूर्व विभागाने मुंबई मेट्रो तीनच्या कंत्राटदाराला काम थांबवण्याची नोटीस बजावली आहे. कुलाबा ते सीप्झ या मेट्रो ३ प्रकल्पाचे बीकेसी परिसरात इन्कम टॅक्स कार्यालयाजवळ बांधकाम सुरू असून त्यात प्रदूषणाच्या नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आल्यामुळे नोटीस बजावण्यात आली.
मुंबईत मोठय़ा प्रमाणात सुरू असलेली बांधकामे आणि त्यामुळे होणारे धूळ प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने बांधकामांच्या ठिकाणी अमलात आणण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्याअंतर्गत बीकेसी परिसरात एच पूर्व विभागाने मोठी कारवाई हाती घेतली आहे.
हेही वाचा >>> वाढत्या प्रदुषणामुळे तूर्तास आरोग्याला धोका नाही; मुंबई महानगरपालिका आयुक्त चहल
बीकेसी परिसरात हवेचा स्तर खालावल्याचे वारंवार निदर्शनास येते. या परिसरात मोठय़ा प्रमाणावर खासगी व शासकीय स्वरूपाची बांधकामे सुरू आहेत. या सर्व बांधकामांची पाहणी करून त्यांना पालिकेच्या एच पूर्व विभागाच्या वतीने मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यासाठी नोटीस देण्यात आली होती. मात्र, मेट्रो ३ च्या बांधकामस्थळी या सूचनांचे पालन होत नसल्यामुळे जे कुमार या कंत्राटदाराला काम थांबवण्यासंदर्भातील स्टॉप वर्कची नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, बीकेसी परिसरात गेल्या आठवडय़ाभरात तब्बल नऊ विविध बांधकामांना पालिकेच्या विभाग कार्यालयाने कामे थांबवण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही विविध बांधकामांच्या ठिकाणी नोटिसा बजावल्या आहेत. १४ ठिकाणी रेडी मिक्स प्लान्ट (आरएमसी)ला कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. त्यापैकी चार आरएमसी प्लान्ट हे मुंबई महापालिकेच्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पाच्या ठिकाणचे आहेत, तर दोन प्लान्ट हे मुंबई मेट्रो प्रोजेक्ट येथील आहेत.