मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) गुंदवली – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो ७ अ मार्गिकेचे काम हाती घेतले आहे. या कामादरम्यान कंत्राटदाराने वायू प्रदुषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे मुंबई महापालिकेने कंत्राटादाराला नोटीस बजावली आहे. या नोटीशीनंतर आवश्यक ती सुधारणा न केल्यास काम बंदची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
दहिसर – गुंदवली मेट्रो ७ मार्गिकेच्या गुंदवली – विमानतळ दरम्यान मेट्रो ७ अ मार्गिकेच्या माध्यमातून विस्तार केला जात आहे. या ३.४ किमी लांबीच्या मार्गिकेतील ०.९४ किमीचा भाग उन्नत, तर २.५०३ किमीचा भाग भुयारी आहे. या मार्गिकेचे काम सध्या कंत्राटदार जे. कुमार कंपनीकडून सुरू आहे. मात्र या कंपनीकडून कामादरम्यान वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन केले जात असल्याचे पालिकेच्या तपासणीत स्पष्ट झाले. मुंबईतील वायू प्रदुषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने विकास कामे, प्रकल्पस्थळांसाठी वायू प्रदुषण नियंत्रण नियमावलीअंतर्गत २८ मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाते की नाही याची तपासणी पालिकेच्या पथकाकडून नियमितपणे केली जाते.
दोन दिवसांपूर्वी पालिकेच्या पथकाने मेट्रो ७ अ मार्गिकेच्या कामाची पाहणी केली. यावेळी २८ पैकी काही मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात येत नसल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती पालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली. चाक धुण्याची सोय आणि हवा गुणवत्ता निर्देशांक यंत्रणा नसल्याचे यावेळी दिसून आले. या कारणांसाठी पालिकेने कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी यास दुजोरा दिला.
पालिकेच्या नोटीशीनुसार कंत्राटदाराने तातडीने आवश्यक त्या सुधारणा न केल्यास काम बंद करण्याची कारवाई पालिकेकडून केली जाण्याची शक्यता आहे. याविषयी एमएमआरडीएकडे विचारणा केली, मात्र त्यांच्याकडून प्रतिक्रिया उपलब्ध झालेली नाही. दरम्यान, मुंबई महानगर प्रदेशात वायू प्रदुषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून यासाठी बांधकाम प्रकल्प, विकास कामे जबाबदार असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे एमएमआरडीएने वायू प्रदूषण नियंत्रण नियमावली तयारी केली. या नियमावलीचे पालन कंत्राटदारांकडून केले जाते की नाही याची तपासणी करून दंडात्मक कारवाई केली जाते. मेट्रो ७ अच्या कामादरम्यान कंत्राटदाराकडून नियमावलीचे उल्लंघन केले जात असून एमएमआरडीएचे त्याकडे लक्ष नाही का अशा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
संबंधित कंत्राटदार वादात
पालिकेकडून नोटीस बजावण्यात आलेली कंत्राटदार कंपनी जे. कुमार नेहमीच वादात असते. या कंपनीकडे मेट्रोसह एमएमआरडीएचे अन्य काही प्रकल्प आहेत. मेट्रो ९ मार्गिकेच्या कामात अनेक छोटे-मोठे अपघात या कंपनीकडून झाले असून माहिती अधिकाराखाली उपलब्ध झालेल्या माहितीनुसार यात पाच जणांची बळी गेला आहे. मेट्रोसह अनेक कामांमध्ये हलगर्जीपणा, कामाचा दर्जा योग्य नसणे अशा अनेक कारणांमुळे एमएमआरडीए आणि मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनकडून (एमएमआरसी) आतापर्यंत या कंपनीला ७ कोटींहून अधिक दंड ठोठावण्यात आला आहे. आता या कंपनीकडून मेट्रो ७ अच्या कामात वायू प्रदुषण नियंत्रण नियमावलीचे पालन केले जात नसल्याचे स्पष्ट झाले. आता याबाबत एमएमआरडीएकडून कारवाई केली जाते का हे पाहणे महत्त्वाचे आहे.
