मुंबई : महानगरपालिका प्रशासनाने मुंबईत नुकत्याच ‘नमो नेत्र संजीवनी अभियानाची अंमलबजावणी सुरू केली असून १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान हे अभियान सुरू राहणार आहे. सकाळी १० ते दुपारी ३ दरम्यान नागरिकांना डोळ्यांची तपासणी करता येणार आहे. या अंतर्गत आयोजित शिबिरांमध्ये प्रामुख्याने डोळ्यांचे प्राथमिक विकार, चष्म्याचा नंबर व मोतीबिंदू इत्यादींची तपासणी केली जाणार आहे. यातील मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन उपनगरीय रुग्णालय व महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमार्फत करण्यात आले आहे.
अंधत्वाचे प्रमाण कमी करण्याचे केंद्र शासनाचे उद्दिष्ट
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय धोरणामध्ये नमूद केल्यानुसार, २०२५ पर्यंत अंधत्वाचे प्रमाण १.४ टक्क्यावरून ०.२५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दीष्ट लक्षात घेऊन राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष व महानगरपालिका यांच्या समन्वयाने ‘नमो नेत्र संजीवनी अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत मुंबईतील विविध ५८ ठिकाणी बुधवारी नेत्र तपासणी शिबिरांचे उद््घाटन करण्यात आले. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांच्या निर्देशांनुसार, ‘नमो नेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियान’ या विशेष मोहिमेची मुंबईत अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
५८ ठिकाणी सर्वेक्षण व नेत्र तपासणी
या मोहिमेसाठी सार्वजनिक आरोग्य विभागातील ‘आशा सेविका’ आणि ‘आरोग्य सेविका’ यांच्यामार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. तर मुंबईतील विविध ५८ ठिकाणी सर्वेक्षण व नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ही शिबिरे १७ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत दररोज सकाळी १० ते दुपारी ३ या दरम्यान सुरू राहतील. विविध ५८ ठिकाणी आयोजित करण्यात येणारी नेत्र तपासणी शिबिरे महानगरपालिकेच्या मुरली देवरा महानगरपालिका नेत्र रुग्णालयासह के. ई. एम. रुग्णालय, बा. य. ल. नायर रुग्णालय, शीव येथील लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालय, डॉ. रु. न. कुपर रुग्णालय या प्रमुख रुग्णालयांमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर महानगरपलिकेच्या १० उपनगरीय रुग्णालयांसह सर्व विभागांमधील ३३ पॉली क्लिनिक आणि १० ठिकाणी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने ही शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.
‘ही’ लक्षणे दिसल्यास तपासणी करा
डोळ्यांची जळजळ, डोळयांना सूज व डोळयात सतत पाणी येणे, धूसर अथवा अस्वस्थ दृष्टी असणे, हळूहळू अथवा अचानक दृष्टी कमी होणे, सतत डोकेदुखी, प्रकाशाभोवती वर्तुळे दिसणे, डोळ्यात मास किंवा पडदा येणे इत्यादी त्रास असल्यास त्यांनी या शिबिरांमध्ये तपासणी करून घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. तसेच, १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी संस्था व खासगी विभाग यांच्यामार्फत राज्यात एक लक्ष मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दीष्ट निर्धारित करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करून त्याद्वारे सामान्य जनतेमध्ये नेत्रदानाबाबत देखील जनजागृती करण्यात येणार आहे.