मुंबई: पवई तलावात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या जलपर्णीमुळे निर्माण झालेल्या पर्यावरणीय संकटावर मात करण्यासाठी आता स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणप्रेमी सरसावले आहेत. तलावाची स्वच्छता आणि जलपर्णीमुक्त करण्यासाठी त्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, याप्रकरणी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्र्यांनाही ईमेलद्वारे तक्रार केली आहे.

‘सेव्ह पवई लेक’ या नावे सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत रहिवाशांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेल पाठवले असून त्वरित हस्तक्षेप करून अधिकाऱ्यांना जलपर्णी हटवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी केली आहे. अनेकवेळा अधिकाऱ्यांकडे तक्रारी करुनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, अशी खंत जलवायू विहारच्या रहिवासी पामेला चीमा यांनी व्यक्त केली.

तलावातील जलपर्णी तलावात सूर्यकिरण पोहोचवण्यास अडथळा निर्माण करते. त्यामुळे जैवविविधतेवर प्रतिकूल परिणाम होतो. अधिकाऱ्यांनी तलावात कोणतेही नाल्याच्या किंवा मलजलवाहिन्या सोडल्या आहेत का, याची तपासणी करावी असे नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी.एन.कुमार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या ईमेल मध्ये नमूद केले आहे.

पवई तलाव हा मगरी, मासे, पक्षी आणि इतर अनेक जलचरांचे निवासस्थान आहे. तसेच सध्या तलावाची अवस्था दयनीय झाली असून ही दृष्ये मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या कोणालाही स्पष्टपणे दिसतात, असेही कुमार यांनी निदर्शनास आणून दिले. या तलावाकडे कोणत्याही अधिकाऱ्यांचे किंवा निवडून आलेल्या नेत्यांचे लक्ष का गेले नाही? असा सवाल उपस्थित केला आहे.

मुंबईत सुशोभीकरणाच्या अनेक घोषणा झाल्या पण त्या प्रत्यक्षात उतरत नसल्याची खंत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली. कार्यकर्ते शब्बीर तांबावाला यांनी तलावाच्या विदारक स्थितीची छायाचित्रे मुख्यमंत्र्यांना पाठवली. तसेच पालिका आयुक्तांनाही ती पाठवण्यात आली आहेत. दरम्यान पवई तलाव हा मुंबईतील एकमेव मोठा तलाव असून अनेक मुंबईकर व पर्यटकही तेथे पर्यटनासाठी हमखास भेट देत असतात. हा तलाव आता प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. जलाशयात जलपर्णी, गाळ आणि सांडपाण्यामुळे पाण्याची गुणवत्ता खालावली आहे.

तलावाची स्थिती

तलावाच्या पाण्याची गुणवत्ता खालावली आहे. तलावात जलपर्णी आणि इतर वनस्पतींची वाढ झाली आहे. ज्यामुळे युट्रोफिकेशनची समस्या निर्माण झाली आहे.२००२ साली, राष्ट्रीय तलाव संरक्षण योजनेअंतर्गत पवई तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी एक प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पात जलपर्णी काढणे, जलशुद्धीकरण, आणि परिसराचे सौंदर्यीकरण यांचा समावेश होता. आयआयटी मुंबईच्या १९८० च्या बॅचनेही तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी योगदान दिले आहे.

जैवविविधता

पवई तलाव विविध पक्ष्यांच्या प्रजातींचे निवासस्थान आहे. तेथे स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांचे वास्तव्य आहे. त्यात ओरिएंटल डार्टर आणि ब्लॅक-हेडेड आयबिस अशा काही दुर्मीळ आणि संकटग्रस्त प्रजातींचाही समावेश आहे.

मगरींचा अधिवास

पवई तलावात मगरींचा अधिवास आहे. अनेकदा मगरी तलावाच्या काही भागांत सहजपणे दिसतात. तसेच आयआयटी मुंबई परिसर आणि आजूबाजूच्या परिसरात अनेकदा मगरी विहार करताना दिसल्या आहेत. विशेषतः पावसाळ्यात जेव्हा पाण्याची पातळी वाढते तेव्हा मगरी तलावाबाहेर येतानाही दिसतात. महानगरपालिकेने २०२२ मध्ये प्रथमच पवई तलावातील मगरींची गणना केली त्यात १८ मगरी आढळल्या होत्या. त्या प्रामुख्याने आयआयटी मुंबई आणि रेनिसंस हॉटेलच्या परिसरात दिसतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रासायनिक पदार्थांवर बंदी

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पवई तलावात जलपर्णी नष्ट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक पदार्थांवर बंदी घातली आहे, कारण हे रसायन मगरी आणि इतर जीवांसाठी हानिकारक ठरू शकते. (फोटो पाठवला आहे) (अभिषेक तेली