मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवात बृहन्मुंबई महानगरपालिकेने अर्थसहाय्य केलेल्या महिला बचत गटांनी तयार केलेले मोदक मुंबईकरांना उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी २१ ते २५ ऑगस्ट २०२५ दरम्यान ‘मोदक महोत्सव २०२५’चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत नागरिकांना मोदकांसाठी https://shgeshop.com या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. गणेशचतुर्थीच्या दिवशी मोदकांचे घरपोच वितरण केले जाणार आहे.

पुढील आठवड्यापासून गणेशोत्सवाला सुरूवात होत असून नैवेद्य म्हणून सगळ्यात आधी पुजेच्या ताटात मान मिळविणारा पदार्थ म्हणजे मोदक. गणेशभक्तांना मोदक उपलब्ध व्हावेत यासाठी मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला आहे. मुंबई महानगरातील गरजू महिलांना आर्थिक सक्षम, तसेच स्वावलंबी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक सहाय्याने महिला बचत गट निर्माण करण्यात आले आहेत. नियमित उपक्रमांच्या पलीकडे जाऊन या महिला बचत गटांना नाविन्यपूर्ण व व्यवसायाभिमुख उपक्रमांच्या मदतीने अधिक संधी उपलब्ध करून दिल्या जातात. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने अर्थसहाय्य केलेल्या या महिला बचत गटांनी गुढीपाडव्याच्या प्रसंगी पुरणपोळी महोत्सव राबविला होता. त्याला मिळालेला उत्कृष्ट प्रतिसाद लक्षात घेता सार्वजनिक श्रीगणेशोत्सव-२०२५ च्या पार्श्वभूमीवर या महिला बचत गटांकडून ‘मोदक महोत्सव- २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे.

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मोदक घरपोच

गणेशोत्सवात मोदकांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे वाढत्या मागणीचा विचार करून महिला बचत गटांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. याअंतर्गत उकडीचे आणि तळलेले मोदक ग्राहकांना मिळणार आहेत. ज्या भाविकांना बचत गटांनी तयार केलेले मोदक हवे असतील त्यांनी https://shgeshop.com या संकेतस्थळावर २१ ते २५ ऑगस्ट दरम्यान ऑनलाईन मागणी नोंदवावी. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर, गणेश चतुर्दशीच्या मुहूर्तावर म्हणजेच २७ ऑगस्ट २०२५ रोजी संबंधित भाविकांना मोदक घरपोच मिळतील, अशी माहिती संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली.