लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पालिकेच्या आगामी अर्थसंकल्पाचे निमित्त साधून शिवसेना-भाजप युतीने मुंबईकरांवर विविध योजनांची खैरात केली. या योजनांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, महिला, फेरीवाले, क्रीडापटू, साहित्यिकांसह सर्वसामान्यांना खूश करण्याचा प्रयत्न युतीने केला आहे.  आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन विकासकामांना गती देण्यासाठी अतिरिक्त विकासनिधीच्या रूपात नगरसेवकांच्या झोळीत ६० लाख रुपये निधी टाकण्यात आला आहे.
पालिकेच्या ३१,१७८ कोटी रुपयांच्या, ५ कोटी ७७ लाख रुपये शिलकीच्या अर्थसंकल्पात ५५० कोटी रुपयांचे फेरबदल करीत स्थायी समितीने बुधवारी मंजुरी दिली. विधानसभा निवडणुकीपूर्वी विकासकामांचा धडाका लावता यावा यासाठी नगरसेवकांना अतिरिक्त ६० लाख रुपये विकासनिधी देण्यात आला आहे. यापूर्वी नगरसेवकांना ६० लाख रुपये नगरसेवक निधी आणि ४० लाख रुपये विकास निधी मिळत होता. आता त्यांच्या पदरात तब्बल १ कोटी ६० लाख रुपये निधी पडणार आहे. मात्र यामुळे पालिकेच्या तिजोरीवर अतिरिक्त २१० कोटी रुपयांचा बोजा पडेल.
अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी  एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याशिवाय निराधार ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय मदत म्हणून १०,००० रुपये देण्याची घोषणाही करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांना मोफत श्रवणयंत्र आणि मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात येईल. निराधार, एकाकी ज्येष्ठ नागरिकांनी दूरध्वनीवरून संपर्क साधताच त्यांच्या घरी मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्याच्या योजनेची घोषणा स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत केली.
महापालिकेच्या प्रसूतिगृहात जन्मणाऱ्या मुलींच्या नावे तात्काळ १५ हजार रुपये ठेव स्वरूपात बँकेत ठेवण्यात येणार आहेत. ती बालिका १८ वर्षांची झाल्यानंतर तिला एक लाख रुपये मिळतील. यासाठी ५२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पालिका रुग्णालयांमध्ये प्रसूतीसाठी नोंदणी करणाऱ्या गरोदर महिलांना रुग्णालयात दाखल होण्यासाठी आणि प्रसूतीनंतर घरी जाण्यासाठी मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात येणार आहे. दूरध्वनी करताच रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे, असे शेवाळे म्हणाले.
पालिकेच्या योजना
*प्रत्येक विभागात जलतरण तलाव उभारण्यासाठी २५ कोटी
*रेनवॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्या सोसायटय़ांना मालमत्ता करात ५ टक्के सूट
*आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या करदात्यांच्या मुलांना मदत
*साहित्य संमेलन-नाटय़ संमेलनासाठी प्रत्येकी १० लाखांची मदत
*विक्रोळीत आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर उभारणार
*उपनगरात आंतरराष्ट्रीय स्टेडियमसाठी २५ लाखांची तरतूद
*बेस्टला ५० कोटींची मदत