या प्रकल्पाचे काम जेवढे पूर्ण झाले आहे, त्याचा दर्जा तपासण्यासाठी वीरमाता जिजाबाई भोसले तंत्रज्ञान संस्थेची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.
मुंबई: मुंबईतील पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा जलवाहिनीच्या दोन्ही बाजूला सुमारे ३९ किलोमीटर लांबीचा सायकल ट्रॅक सुरू करण्याचा पालिकेचा प्रकल्प रखडला आहे. एकूण ४८८ कोटींच्या या प्रकल्पासाठी आतापर्यंत १२५ कोटी खर्च झाले आहेत. मार्च २०२१ मध्ये प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते.




मुंबईला पाणीपुरवठा करणारी ३९ किलोमीटर लांबीची तानसा जलवाहिनी मुंबईत आहे. या जलवाहिनीचा एक भाग मुलुंड ते धारावी असून दुसरा भाग घाटकोपर ते शीव असा आहे. या जलवाहिनीच्या दोन्ही बाजूला १० मीटर अंतरापर्यंत असणारी अतिक्रमणे हटवून जलवाहिनी सुरक्षित करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने पालिकेला दिले होते. ही जलवाहिनी पालिकेच्या तब्बल नऊ प्रशासकीय विभागातून जात असल्यामुळे या विभागांनी अतिक्रमणे हटवली. यामध्ये मुलुंड, भांडुप, सहार, वाकोला, हुसेन टेकडी, खार पूर्व, माहीम, धारावी, घाटकोपर, कुर्ला पूर्व, आणिक डेपो आदी परिसरांचा समावेश होतो. या जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून पालिकेने संरक्षक भिंतही बांधली. मोकळय़ा जागेचा लोकांना उपयोग व्हावा म्हणून पालिकेने महत्त्वाकांक्षी असा हरितवारी जलतीरी प्रकल्प आणला. तब्बल ४८८ कोटींचा प्रकल्प तीन टप्प्यात करण्यात येणार आहे. २०१८ मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प मार्च २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र मुदत उलटून एक वर्ष होत आले तरी तो अपूर्ण आहे. या प्रकल्पासाठी १२५ कोटी खर्च झाले आहेत. आगामी अर्थसंकल्पात महानगर पालिकेने ४५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.