मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या बहुतेक शाळांमधील बालवाड्यांमध्ये नियोजनाचा अभाव असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक बालवाड्यांमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट मुले शिक्षण घेत आहेत. नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजीचे वर्ग एकत्र घेण्यात येत असल्याने मुलांना आणि शक्षकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी एकाच वर्गात ६०-७०-८० मुले कोंबून शिक्षण घेत आहेत.
९०० बालवाड्यांत २५-२६ हजार मुले
महानगरपालिका प्रशासनामार्फत मुंबईत सुमारे ९०० बालवाड्या चालविल्या जात असून त्यात सुमारे २५ ते २६ हजार मुले शिक्षण घेत आहेत. बालवाडीतील मुलांना शिकवण्यासाठी ९०० शिक्षिकांसह ९०० मदतनीस असे एकूण १८०० कर्मचारी काम करतात. बालकांचा सर्वांगीण विकास, पूर्व – प्राथमिक शिक्षणाच्या तयारीसाठी महत्त्वाचा टप्पा असलेल्या बालवाडीत मुलांना अक्षर, अंक, रंग, आकार यांची ओळख करून दिली जाते. या मुलांच्या सुरुवातीच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केल्यास त्यांचे भविष्यातील शालेय शिक्षण सोपे जाते. महानगरपालिकेने सुरू केलेल्या बालवाड्या दुर्बल घटकातील मुलांसाठी मोठा आधार असतो.
एकाच वर्गात ६० ते ८० विद्यार्थी
मात्र, अनेक बालवाड्यांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक म्हणजेच ४० ते ६० ते ८० मुले आहेत. प्रत्येक वयोगटातील विद्यार्थ्यांची आकलन क्षमता, समज वेगळी असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या वर्गात शिक्षण देणे सुलभ ठरते. मात्र, अनेक शाळांमध्ये एकाच वर्गात नर्सरी, ज्युनिअर, सिनिअरचे वर्ग एकत्र घेतले जातात. तिन्ही वयोगटातील मुलांना अध्यापन करताना शिक्षकांनाही विविध अडचणी येतात.
तसेच, बालवाडीसाठी वर्गांची कमतरता असल्यामुळे शाळेच्या सभागृहात बालवाडीच्या वर्ग भरविले जात आहेत. मानेकलाल मेहता शाळेच्या बालवाडीत तब्बल ६० मुलांमागे एक शिक्षिका अध्यापन करत आहे. घाटकोपरमधील पालिकेच्या पंतनगर शाळेत बालवाडीचे वर्ग इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर भरविले जातात. तसेच, भांडुपमधील महावीर शिंदे शाळेतही बालवाडीसाठी वर्ग उपलब्ध नसल्याने शाळेच्या सभागृहात तीन वर्ग एकत्र बसविले जातात. त्यामुळे अन्य मुलांचा परिपाठ शाळेच्या कॉरिडॉरमध्ये घेतला जातो. लगतच शौचालय असल्यामुळे आसपास ओलावा असलेल्या जमिनीवर बसून विद्यार्थी प्रार्थना म्हणत असल्याचे अलीकडेच दिसून आले.
कुर्ला येथील पालिकेच्या स. गो. बर्वे या शाळेतही नर्सरी, ज्युनिअर, सिनिअरचे वर्ग एकत्र भरविले जातात. तीन तासांमध्ये घेतल्या जाणाऱ्या वर्गात मुलांचा गोंधळ, भांडणे सोडवणे, त्यांना शांत करण्यातच शिक्षकांचा अर्धा वेळ निघून जातो. विक्रोळीतील पालिकेच्या शाळेतील बालवाडीतही सारखीच समस्या आहे. मुलुंडमधील पालिकेच्या एका बालवाडीत ८० मुले शिक्षण घेत आहेत, तर भांडुप आणि गोवंडीतील पालिकेच्या बालवाडीत शैक्षणिक साहित्य ठेवण्यात आले आहे.
नियोजनाचा अक्षम्य अभाव
महानगरपालिकेकडून शालेय दर्जा आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबविले जातात. मात्र, शिक्षणाची सुरुवात होणाऱ्या बालवाड्यांमध्ये नियोजनाचा अभाव असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. तीन वर्ग वेगवेगळे भरविण्याबाबत संस्थेकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र, वर्ग उपलब्ध नसल्याने एकाच वर्गात ५०हून अधिक वेगवेगळ्या वयोगटातील मुलांना शिकवावे लागत आहे. अनेकदा यामुळे मानसिक तणावही येतो. शिवाय पगारही वेळेवर मिळत नाही, अशी खंत कुर्ला येथील एका बालवाडी शिक्षिकेने व्यक्त केली. बालवाडीच्या समस्यांबाबत बोलण्यासाठी महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी सुजाता खरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही.
महानगरपालिका प्रशासन बालवाडी ही संकल्पनाच चुकीच्या पद्धतीने राबवते. बालवाडीत किमान १५ ते २० विद्यार्थी असायला हवेत. पालिकेच्या शाळेत मुलांची संख्या जास्त असल्यास शिक्षकांना त्यांच्याकडे नीट लक्ष देता येत नाही. शिक्षक, मदतनीस बालवाडीतील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी जीवापाड मेहनत घेतात, गल्लीबोळात जाऊन सर्वेक्षणे करतात. मात्र, प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांचेही हाल होतात. शिवाय, बालवाडी चालवण्यासाठी नेमलेल्या अनेक संस्थांकडून शिक्षकांना आवश्यक सहकार्य मिळत नाही. – रमेश जाधव, बालवाडी श्रमिक भारतीय युनियन