मुंबईमधील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिका सर्वसमावेशक आराखडा तयार करणार असून त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.
मुंबईतील वाहतुकीशी निगडित विविध घटकांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी सल्लागारावर टाकण्यात येणार आहे. वाहतुकीबाबत शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करून भविष्यातील विकासासाठी सल्लागाराने आठ महिन्यांमध्ये सर्वसमावेशक आराखडा तयार करून द्यायचा आहे. सल्लागाराने सुचविलेले प्रकल्प प्राधान्याने राबविण्यासाठी प्रकल्पाच्या निविदा सल्लागारामार्फतच तयार करण्यात येणार आहेत.
या कामाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या सल्लागाराला बेस्ट बस, रेल्वे, मोटरगाडी, टॅक्सी, रिक्षा, सायकल मोटरसायकल, मोनोरेल, मेट्रो यांतून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे सर्वेक्षण करावे लागणार आहे. महापालिका, मुंबई प्रादेशिक विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे, बेस्ट यांच्याजवळील उपलब्ध माहितीचा अभ्यास करणे, वाहतुकीची ठिकाणे, स्वरुप, वेळ आदींचे संगणकीय प्रारुप तयार करणे, वाहनतळ सव्र्हेक्षण, दिशादर्शक फलक, जंक्शन, अर्धवट राहिलेल्या मार्गिका आदींचाही अभ्यास सल्लागाराला करावा लागणार आहे.
केंद्रीय नगरविकास खात्यामार्फत निवडण्यात आलेल्या २२ सल्लागारांपैकी चार कंपन्यांकडून हा आराखडा तयार करण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी दिली.