रस्त्यावरील खड्डे शोधण्यासाठी पालिका प्रशासनाने स्वतचे मोबाइल अ‍ॅप विकसित केले असून त्यात जीपीएस प्रणालीचा वापर केला जाणार असल्याने खड्डे शोधण्यास मदत होईल. अँड्रॉइड व आयफोनवर हे अ‍ॅप पावसाळ्यापूर्वी सुरू करण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत.
रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या दृष्टीने पालिकेने काही वर्षांपूर्वी ऑनलाइन प्रणालीची मदत घेतली. याद्वारे खड्डय़ांचे छायाचित्र काढून ते पालिकेच्या संकेतस्थळावरील एका िलकवर टाकले जात असे. संबंधित वॉर्ड अधिकाऱ्याला या खड्डय़ांची माहिती देऊन त्यानंतर तो बुजवला जात असे. एका खासगी कंपनीकडून हे काम सुरू होते. मात्र या कंपनीचे कंत्राट तीन महिन्यांपूर्वी संपल्यावर पालिकेने त्यांना कंत्राट वाढवून दिले नाही तसेच नव्या कंत्राटदाराचीही नेमणूक न केल्याने या पावसाळ्यातील खड्डे दुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र आता पालिकेने यावर उत्तर शोधत स्वतचे मोबाइल अ‍ॅप विकसित केले आहे.
हे मोबाइल अ‍ॅपमध्ये अक्षांश-रेखांशची नोंद आपोआप होते. त्यामुळे केवळ छायाचित्र काढले तरी जीपीएस व जीआयएसच्या मदतीने पालिकेला या खड्डय़ांची माहिती मिळेल. अर्थात छायाचित्र अ‍ॅपमध्ये टाकताना खड्डय़ाजवळ उभे राहणे आवश्यक आहे. घरी येऊन छायाचित्र टाकल्यास अक्षांस व रेखांश या छायाचित्रासोबत जोडले जातील. मात्र यामुळे खोटय़ा तक्रारी करणाऱ्यांवर चाप बसेल, असे पालिका अधिकाऱ्यांना वाटते.
पालिकेने तयार केलेले हे सॉफ्टवेअर अधिक विकसित आहे. त्यासाठी कोणताही खर्च झालेला नाही. माहिती तंत्रज्ञान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तयार केलेल्या या अ‍ॅपमध्ये अधिक वैशिष्टय़े आहेत. संकेतस्थळ आणि सॉफ्टवेअर वेळोवेळी अद्ययावत केले जातील, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc to launch new pothole tracking app
First published on: 24-05-2016 at 05:37 IST