मुंबई : हार्बर मार्गावरील सीएसएमटी येथे एकाच आठवड्यात दोनदा लोकल रेल्वे रुळावरून घसरण्याची घटना घडली. त्यानंतर गुरुवारी सकाळपासून हार्बर मार्गावर वेगमर्यादा लागू करण्यात आली आहे. परिणामी प्रवासाचा कालावधी वाढला आहे. हार्बर मार्ग पूर्णपणे विस्कळीत झाला असून एका मागे एक लोकल उभ्या आहेत. लोकल कूर्मगतीने पुढे सरकत असल्याने प्रवाशांना कार्यालयात पोहोचायला विलंब होत आहे.

मध्य रेल्वेच्या कारभारामुळे प्रवाशांचा बळी जाण्याच्या घटना घडत आहेत. तर गेल्या तीन दिवसांत एक दिवसाआड दोनदा लोकल रेल्वे रुळावरून घसरली. रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे हजारो प्रवाशांचा आणि लाखो कुटूंबियाचा जीव टांगणीला लागतो आहे. सोमवारी हार्बर मार्गावरील सीएसएमटीच्या फलाट क्रमांक दोन वर लोकल येत असताना, लोकल रेल्वे रूळावरून घसरली. त्यानंतर सुमारे तीन तासांनी हार्बर मार्ग सुरू करण्यात आला. त्यानंतर मंगळवारी रात्रीच्या सुमारास मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांच्यासह वरिष्ठ रेल्वे अधिकारी दुर्घटनास्थळी पाहणी करत होते.

हेही वाचा…‘सांग सांग भोलानाथ… निवडून येणार काय?’

त्यांचा पाहणी दौरा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी, बुधवारी दुपारी ४.१३ च्या सुमारास त्याच ठिकाणाजवळ लोकल रेल्वे रूळावरून घसरली. मात्र, ही पाहणी चाचणी असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा…दाम्पत्याने गुंगीचे औषध देऊन तरूणीचे केले अश्लील चित्रीकरण; बलात्कार, खंडणीची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा

सोमवारी दुर्घटना घडल्यानंतर पुढील क्षणी वेगमर्यादा लागू करणे आवश्यक होते. त्याठिकाणी वेगमर्यादा ताशी ३० किमीवरून ताशी १५ ते २० किमी करणे सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक असताना, मध्य रेल्वेने ताशी ३० किमीच वेगमर्यादा ठेवली. अखेर आजपासून मध्य रेल्वेने वेगमर्यादा लागू केली आहे. दरम्यान, याबाबत मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडे विचारणा केली असता, हार्बर मार्ग का विस्कळीत झाला आहे, याची चौकशी करून सांगण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.