राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय क्षेत्रातील नेत्यांसह सामान्यांच्यादेखील यावर प्रतिक्रिया येत आहेत. त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी आता अनेकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे मार्निंग वॅाकसाठी निघाल्या असत्या संदेश पवार या सफाई कामगाराने त्यांना थांबवून आपल्या भावना व्यक्त केल्या. या संदर्भात सुप्रिया सुळेंनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत माहिती दिली.

हेही वाचा – राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अजित पवार की सुप्रिया सुळे? संजय शिरसाट म्हणाले, “आजची परिस्थिती बघता…”

यासंदर्भात बोलताना संदेश पवार म्हणाले, काल शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदावरून राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. शरद पवार हे शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचे पाईक आहेत. त्यामुळे त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा आणि पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारावं, अशी माझी इच्छा आहे. संदेश पवारांच्या या प्रतिक्रियेनंतर सुप्रिया सुळे यांनीही त्यांचे आभार मानले.

शरद पवारांनी दिला पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

दरम्यान, काल शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्ती प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना अचानक आपल्या पक्षाच्या अध्यपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. ते म्हणाले, “मी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. तेव्हापासून गेली २४ वर्षे या अध्यक्ष म्हणून काम पाहतो आहे. सार्वजनिक जीवनातील १ मे १९६० पासून सुरु झालेला हा प्रवास ६३ वर्षांपासून अवरित सुरू आहे. त्यापैकी ५६ वर्षे मी कुठल्या ना कुठल्या सभागृहाचा सदस्य किंवा मंत्री म्हणून सातत्याने काम करत आहे. आता राज्यसभेच्या सदस्यत्वाची ३ वर्षे शिल्लक आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नांमध्ये अधिकाधीक लक्ष घालण्याचा माझा प्रयत्न असेल, १ मे १९६० ते १ मे २०२३ इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता कुठेतरी थांबवण्याचा विचार करणे आवश्यक आहे, त्यामुळे अधिक मोह न करता मी राष्ट्रीय अध्यक्ष पदावर निवृत्त होण्याचा निर्णय घेतो आहे.”