कालाय तस्मै नम: काळ बदलला की माणसाची वागणूकही बदलते. पालिकेच्या कीटकनाशक विभागातील कर्मचाऱ्यांना याचा नेमका अनुभव सध्या येत आहे. अगदी पंधरा-वीस दिवसांपूर्वीपर्यंत या कर्मचाऱ्यांना तुच्छतेने वागवणारे मध्यम-उच्चभ्रू वस्तीतील रहिवासी डेंग्यूच्या भीतीने घराची पाहणी करण्यास सहर्ष परवानगी देत आहेत. मात्र डेंग्यूची साथ असेपर्यंतचा हा तात्पुरता बदल असून डेंग्यूच्या प्रतिबंधक उपायांबाबत मुंबईकर उदासीनच आहेत.
मलेरियाचा संसर्ग पसरवणारे अॅनाफिलीस आणि डेंग्यूचा प्रसार करणारे एडिस या डासांची उत्पत्तिस्थाने कमी करण्यासाठी पालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून वर्षभर मोहीम राबवली जाते. मात्र पावसाळ्याचे चार महिने वगळता मुंबईकर स्वतच्या घरात डासांची पैदास होण्याबाबत उदासीन राहतात. त्यामुळे घरातील फेंगशुई रोपटी, मनी प्लाण्ट, शीतकपाटाचे (फ्रिज) ट्रे, वातानुकूलन यंत्रणेखालचे भांडे, कुंडय़ाखालच्या थाळ्या यांमध्ये डासांची वारेमाप पैदास होते. या वस्तूंची तपासणी करण्यासाठी गेलेल्या कीटकनाशक विभागाच्या कर्मचाऱ्यांना घरात तर घेतले जात नाहीच, परंतु तुच्छतेची वागणूक दिली जाते. आम्हाला गरज नाही, आमच्याकडे डासांची उत्पत्ती होत नाही, असे सांगत या कर्मचाऱ्यांच्या तोंडावर दार बंद केले जाते.
मात्र जून-जुलैच्या पावसात मलेरिया आणि पाऊस जाताना उपटणारा डेंग्यू यांची साथ आली की ही भाषा बदलते. सध्या त्याचाच अनुभव कीटकनाशक विभागाचे कर्मचारी घेत आहेत.
सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवडय़ात कीटकनाशक विभागाने केलेल्या कार्यवाहीत तब्बल दीड हजार ठिकाणी डेंग्यूच्या एडिस इजिप्ती डासांची पैदास आढळली. त्यातील दीडशे ठिकाणे झोपडपट्टीत तर उरलेली तब्बल ९० टक्के ठिकाणे मध्यम व उच्चभ्रू निवासस्थानांमध्ये होती. गेली पाच वर्षे डासांच्या उत्पत्तिस्थानाबाबत जागृती करूनही मुंबईकर उदासीन आहेत.
मात्र सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून डेंग्यूची साथ वाढायला लागल्याने आता हा स्वर मवाळ झाला आहे. डेंग्यूचे रुग्ण दिसत असल्याची ओरड सुरू झाल्याने मुंबईकर धास्तावले असून डासांच्या अळ्या शोधण्यासाठी येत असलेल्या पालिकेच्या कीटकनाशक विभागाच्या कर्मचाऱ्यांना तात्पुरती का होईना, चांगली वागणूक मिळत आहे, असे कीटकनाशक विभागाचे प्रमुख राजन नारिंग्रेकर म्हणाले.
डेंग्यूचा रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या घराची व परिसरातील डासांची उत्पत्तिस्थाने शोधली जातात. या रुग्णाच्या घराच्या पन्नास मीटर परिसरात अळ्या सापडतातच. मात्र स्वत:च्या घरातील व्यक्तींनाच त्रास होत असूनही नागरिकांना त्याची जाणीव होत नाही, असे नारिंग्रेकर म्हणाले.
३० सप्टेंबपर्यंत पालिकेकडून संपूर्ण शहरात डासउत्पत्ती प्रतिबंधक जागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. झोपडपट्टय़ांमध्ये छतावर टाकलेले टर्पोलिन आणि पाणी साठवण्याच्या भांडय़ांमध्ये अळ्या सापडतात.
झोपडपट्टीत किमान कर्मचाऱ्यांना डासांची निर्मिती स्थळे काढून टाकता येतात. उच्चभ्रू घरांमध्ये मात्र पाणी साठण्याची ठिकाणे भरपूर आहेत. त्यामुळे रहिवाशांनीच याबाबत जागरूकता बाळगायला हवी, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.