लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुलुंडमधील मिठागराची ५८.५ एकर जागा धारावीतील अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी देण्यात आली असून ही जागा धारावीसाठी देण्यास मुलुंडवासीयांचा प्रचंड विरोध होता. असे असतानाही राज्य सरकारने ही जागा दिल्याने मुलुंडवासीय संतप्त झाले आहेत.

राज्य सरकारच्या या निर्णयाचा निषेध करत मुलुंडमधील जागा धारावीसाठी देण्याविरोधातील आंदोलनाला बळकटी देण्यासाठी काही मुलुंडवासीयांनी मुलुंडमध्ये अनोखे फलक लावले होते. ‘मुलुंडचे नवीन धारावी असे नामांतर होण्याआधी मुलुंडकरांनो जागे व्हा’ असे आवाहन या फलकाच्या माध्यमातून करण्यात आले होते. मात्र आता मुलुंडमधील हे सर्व फलक पोलिसांकडून हटविले आहेत. फलक हटविल्याने मुलुंडवासीयांमध्ये नाराजी व्यक्त केली असून फलक हटवून सत्य लपणार नाही, आंदोलन दडपले जाणार नाही, असे असा इशारा देण्यात आला आहे.

राज्य सरकारने ऑक्टोबरमध्ये केळकर महाविद्यालयाजवळील मिठागराची ५८.५ एकर जमीन ३१९ कोटी रुपयात धारावी पुनर्वसनासाठी दिली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्यापूर्वी एक दिवस आधी जागा देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. असे असताना सत्ताधारी निवडणुकीदरम्यान मुलुंडवासीयांच्या बाजूने असल्याचे सांगत होते, धारावीसाठी एक इंचही जागा दिली जाणार नाही असे आश्वासन देण्यात येत होते. ही मुलुंडवासीयांची मोठे फसवणूक आहे, असा आरोप करीत मुलुंडमध्ये ठिकठिकाणी अनोखे फलक लावून सत्ताधाऱ्यांचा निषेध करण्यात आल्याची माहिती ॲड. सागर देवरे यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सत्ताधाऱ्यांचे सत्य मुलुंडकरांसमोर आणण्यासाठी आणि आंदोलन तीव्र करण्यासाठी ‘मुलुंडचे नवीन धारावी होण्याआधी जागे व्हा’ अशा आशयाचे फलक लावण्यात आले होते. या फलकांसंबंधीचे वृत्त प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झाल्यानंतर मंगळवारी दुपारपासून पोलिसांकडूनही हे फलक हटविण्यास सुरुवात केली आणि सर्वच्या सर्व फलक हटविण्यात आल्याचेही ॲड. देवरे यांनी सांगितले. फलक हटविले तरी सत्ताधाऱ्यांनी मुलुंडवासीयांची फसवणूक केली, त्यांच्या विश्वासघात केला हे सत्य लपणार नाही, असा आरोप करीत देवरे यांनी यापुढे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला.