मुंबई: मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर दाखल झालेल्या कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये शनिवारी पहाटे एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह सफाई कर्मचाऱ्यांना आढळला. याप्रकरणी कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनसवर विविध राज्यातून दररोज ३० ते ३५ गाड्यांची ये-जा सुरू असते. खोरखपूर येथून निघालेली कुशीनगर एक्स्प्रेस शनिवार पहाटे लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये दाखल झाली. प्रवासी निघून गेल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांनी या गाडीची सफाई सुरू केली. यावेळी कुशीनगर एक्स्प्रेसची साफसफाई करताना सफाई कर्मचाऱ्यांना ‘बी २’ या वातानुकूलित डब्यातील स्वच्छतागृहात एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह सापडला. कर्मचाऱ्यांनी तत्काळ याची माहिती आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांना दिली. यासंदर्भात माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला.

याप्रकरणी कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तत्काळ तपासाला सुरुवात केली. काही दिवसांपासून हा मुलगा सुरत येथून बेपत्ता झाल्याची माहिती तपासात उघडकीस आली. त्याच्या आईने याबाबत सुरतमधील अमरोली ग्रामीण पोलीस ठाण्यात मुलाच्या अपहरणाबाबत तक्रार दाखल केली होती. त्याच्या एका नातेवाईकानेच या मुलाचे अपहरण केल्याचे देखील तपासात समोर आले आहे. मुलाचे अपहरण करणाऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.