परीक्षांमध्ये तोतया उमेदवार बसवून पद मिळविण्याची स्पर्धा
स्पर्धा परीक्षांच्या निकालानंतर कौतुकाचे सोहोळे साजरे करत प्रशासनात पदे मिळवलेल्यांपैकी अनेक अधिकारी बोगस असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रशासनात सध्या कार्यरत असलेल्या ४९ अधिकाऱ्यांनी ती पदे मिळविण्यासाठी स्वत: परीक्षा देण्याऐवजी तोतया उमेदवारांना त्यासाठी बसविल्याचे पोलिस तपासातून उघड झाले आहे. अद्यापही ही तोतयेगिरी थांबलेली नाही. गेल्याच आठवडय़ात भायखळा येथे अटक करण्यात आलेले दोन तोतयेदेखील राज्यभर फोफावलेल्या तोतया परीक्षार्थीच्या साखळीचा एक भाग असून त्यांनीही अनेक उमेदवारांसाठी परीक्षा दिल्या असल्याचे समोर आले आहे.
अभ्यासात कठोर मेहनत घेऊन स्पर्धा परीक्षांच्या पायऱ्यांनी सरकारी विभागात अधिकारीपद प्राप्त करण्याचा प्रघात आहे. त्याऐवजी खोटय़ा उमेदवारांना परीक्षांना बसविण्याचा प्रकार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये राजरोसपणे केला जात असल्याचे यापूर्वीही उघड झाले असून, त्यावर कारवाईही झाली आहे. मात्र अद्यापही ही तोतयेगिरी थांबलेली नाही. भायखळा येथे कर सहायक परीक्षेसाठी बसलेले संदीप भुसारी आणि सचिन नराळे या कोल्हापूरमधील विक्रीकर अधिकाऱ्यांना तोतया उमेदवार म्हणून पकडण्यात आल्यानंतर हे दोन्ही उमेदवार काही महिन्यांपूर्वी राज्यभर उघड झालेल्या परीक्षा गैरप्रकारांतील साखळीतील एक भाग असल्याचे समोर आले आहे. याबाबत स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहार उघड करणारे कार्यकर्ते योगेश जाधव यांनी पोलिसांना माहिती दिली होती. विक्रीकर निरीक्षक असलेल्या या दोघांनी यापूर्वी अनेकांना अशा प्रकारातून अनेकांना अधिकारपदाची शिडी मिळवून दिल्याचेही धागेदोरे उलगडत आहेत. ‘या दोघांनी पंचवीस ते तीस उमेदवारांसाठी परीक्षा दिली असू शकते,’ असे जाधव यांनी सांगितले.
यापूर्वी यवतमाळ आणि नांदेडमध्ये तोतया परीक्षार्थीना बसविण्याचा गोरखधंदा उघडकीस आला होता. शिपायापासून ते अ दर्जाच्या पदांपर्यंत सध्या कार्यरत असणारे कर्मचारी आणि अधिकारी हे बोगस असल्याचे किंवा त्यांनी आपल्या परीक्षांमध्ये तोतया उमेदवार बसविले असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. आपल्याऐवजी तोतयांना परीक्षेला बसवून ४९ जणांनी अधिकारीपदे मिळवल्याचे पुरावे हाती लागले आहेत. मात्र या साखळीचे राज्यव्यापी स्वरूप पाहता हा आकडा शेकडोंच्या घरात असल्याचा कयास प्रशासनातील अधिकाऱ्यांनीच मांडला आहे.
गैरप्रकारांचे स्वरूप
मूळ उमेदवाराऐवजी लेखी परीक्षेसाठी तोतया उमेदवारांना बसविताना प्रशासनात कार्यरत असलेल्याच अधिकाऱ्यांना हेरून ठेवले जाते. त्यांना पैशांचे आमिष दाखविले जाते. ते तयार झाले की त्या अधिकाऱ्यांची वेगवेगळ्या रूपात छायाचित्रे काढली जातात. परीक्षेसाठी नोंदणी झालेल्या उमेदवाराची चेहरेपट्टी, केशरचना यांच्याशी साम्य असलेल्या तोतया उमेदवारांना परीक्षेला बसविले जाते. चेहरेपट्टीशी साम्य नसल्यास छायाचित्रामध्ये तांत्रिक सहाय्याने बदल करून मूळ उमेदवार आणि खोटय़ा उमेदवाराच्या छायाचित्रात साधर्म्य तयार केले जाते. छायाचित्र थोडे अस्पष्ट केले जाते. स्पर्धा परीक्षेसाठी एका वर्गात २४ ते २५ उमेदवार असतात. परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात येणारे शासकीय अधिकारी प्रवेशपत्र पाहून उमेदवारांना परीक्षा कक्षात सोडणे, प्रश्न आणि उत्तर पत्रिकांचे वाटप, हजेरी घेणे, गैरहजर उमेदवारांच्या उत्तरपत्रिका त्या-त्या पाकिटात ठेवणे अशा कामांत गुंतले असतात. या सर्व प्रक्रियेत एक ते दीड तासांचा कालावधी जातो. त्यामुळे उमेदवाराचे प्रवेशपत्रावरील छायाचित्र आणि बोगस परीक्षार्थी बारकाईने पाहिले जात नाहीत आणि हा गैरप्रकार साधला जातो.
लाखोंची आर्थिक उलाढाल
यापूर्वी पकडण्यात आलेल्या तोतयांना एका परीक्षेसाठी एक ते दीड लाखांपासून पाच लाखांपर्यंत रक्कम उमेदवार आणि मध्यस्थांकडून मिळाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. उमेदवारांकडून प्रचंड रक्कम ही साखळी चालविणारे मध्यस्थ उकळतात. विशेष म्हणजे या परीक्षांमध्ये तोतया उमेदवार नापास झाला तर त्यासाठी मध्यस्थाला दिली जाणारी रक्कम परत करण्याचा प्रामाणिकपणाही मध्यस्थांकडून दाखविला जातो.
तोतयांची उमेदवारी
तोतया उमेदवार परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला की त्याची मागणी मध्यस्थांकडून वाढते. त्यामुळे त्याला तोतया म्हणून परीक्षांसाठी बसण्याचे वारंवार आमंत्रण दिले जाते. अशा एकेक तोतया परीक्षार्थीने आपली सरकारी नोकरी सांभाळून चक्क पंचवीस परीक्षा दिल्याचे उघड झाले आहे. त्यापैकी एकाने दिलेल्या २४ परीक्षांपैकी १९ परीक्षांमध्ये तो उत्तीर्ण झाला. याचा अर्थ त्याच्यामुळे १९ बोगस अधिकारी पदापर्यंत पोहोचले आहेत.
आतापर्यंतच्या तपासात सध्या प्रशासनात असलेल्या ४९ कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या परीक्षा त्यांच्याऐवजी तोतयांनी दिल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत अजूनही तपास सुरू आहे. भायखळा येथे पकडण्यात आलेल्या एका आरोपीची यापूर्वीही आम्ही चौकशी केली होती. त्यावेळी मोठा तपशील हाती लागला नव्हता. मात्र भायखळा पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडल्यामुळे नवे धागेदोरे हाती लागू शकतील.
– शंकर केंगार, पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग
