बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उर्मिला मातोंडकर यांनी हातावर शिवबंधन बांधत नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. त्याआधी उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधान परिषदेवरील राज्यपालनियुक्त जागेसाठी शिवसेनेच्या कोटय़ातून उर्मिला मातोंडकर यांचे नाव महाविकास आघाडी सरकारने पाठवलं होतं. उर्मिला मातोंडकर मंगळवारी शिवसेनेत प्रवेश करतील अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना दिली होती. त्यानुसार आज दुपारी उर्मिला मातोंडकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी मातोश्रीवर पोहोचल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पत्नी रश्मी ठाकरे आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते. रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्या हाती शिवबंधन बांधत पक्षात स्वागत केलं.

आणखी वाचा- बॉलिवूडमध्ये घाटी संबोधलं जाण्यापासून ते शिवसैनिक; असा आहे उर्मिला मातोंडकरांचा संघर्ष

उर्मिला मातोंडकर दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. उर्मिला मातोंडकर यांनी गेल्या वर्षी काँग्रेस पक्षाच्या वतीने उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. परंतु त्यांचा तेव्हा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षातील गोंधळावर बोट ठेवत पक्षाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसच्या राजीनाम्यानंतर त्या राजकारणात सक्रिय नव्हत्या. पण आता शिवसेनेसोबत त्यांनी नव्याने राजकीय वाटचाल सुरु केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress urmila matondkar joins shivsena sgy
First published on: 01-12-2020 at 13:46 IST