मुंबई : शहरातील शाळांना धमकीचे ई-मेल येण्याचे सत्र सुरूच असून अलिकडेच कुर्ला येथील आंतरराष्ट्रीय शाळेला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला आहे. ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने शाळेच्या परिसरात अनेक बॉम्ब पेरल्याचा दावा केला होता. शाळा प्रशासनाने धमकीच्या या ई-मेलबाबत तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यातील पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (बीडीडीएस) घटनास्थळी धाव घेऊन शाळेची तपासणी केली. पण तेथे काहीच संशयास्पद सापडले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकीचा ई-मेल मंगळवारी दुपारी शाळेला प्राप्त झाला होता. पण बुधवारी सकाळी हा ई-मेल शाळेच्या मुख्याध्यापकांनी पाहिला. आरोपीने ई-मेलमध्ये धमकी दिली होती. तसेच इ-मेलमध्ये अत्यंत शेलक्या भाषेचा वापर करण्यात आला होता. बॉम्बमध्ये शक्तीशाली स्फोटकांचा वापर करण्यात आला असून एकाहून अधिक बॉम्ब शाळा परिसरात पेरण्यात आल्याचे ई-मेलमध्ये नमुद करण्यात आले होते. ‘आता तुम्ही सर्व मरणार आहात. सर्वांचा मृत्यू अटळ आहे’, असे धमकावण्यात आले होते. या कृत्याची जबाबदारी रोडकिल आणि सायलेन्स ही संघटना घेत असल्याही त्यात लिहिण्यात आले होते. तसेच धमकावण्यासाठी अत्यंत्य शेलक्या भाषेचा वापर करण्यात आला आहे. या मागे खोडसाळपणा असल्याचा संशय पोलिसांना आहे. पण तक्रारीनंतर याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखाही याप्रकरणी सखोल तपास करीत आहे. सायबर पोलिसांचीही मदत घेतली जात आहे. तसेच आयपी ॲड्रेसद्वारे पोलीस ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे. शाळेच्या परिसरात कोणताही स्फोटक पदार्थ आढळलेला नसला, तरी पोलिसांनी ही धमकीला गांभीर्याने घेतली सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
अनेक शाळांना धमक्या
शहरातील शिक्षण संस्थांना धमक्यांचे सत्र सुरूच असून गेल्या तीन महिन्यांमध्ये १५ हून अधिक आंतरराष्ट्रीय शाळा व शैक्षणिक संस्थांना धमक्यांचे ई-मेल प्राप्त झाले आहेत. धमकीच्या ई-मेलसाठी स्वीडन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, नॉर्वे या देशांच्या व्हीपीएनचा वापर करण्यात आला आहे. आरोपींनी विविध ई-मेलद्वारे धमक्या पाठवल्या असल्या, तरी त्यातील मजकूर सारखाच असल्यामुळे या मागे एकाच व्यक्तीचा हात असल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.