मुंबई : आईच्या शरीरातील अवयव खाण्याच्या उद्देशाने मद्यधुंद अवस्थेत तिची हत्या केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोषसिद्ध आरोपीला मुलीच्या लग्नासाठी उपस्थित राहण्याची परवानगी उच्च न्यायालयाने सोमवारी दिली. विशेष म्हणजे फाशीच्या शिक्षा झालेल्या दोषसिद्ध आरोपींना तात्पुरता जामीन किंवा पॅरोल किंवा फर्लोसारख्या सवलतींचा अधिकार नाही. परंतु या प्रकरणात दोषसिद्ध आरोपीला त्याच्या मुलीच्या लग्नाला उपस्थित राहण्याची परवानगी देत असल्याचे न्यायालयाने म्हटले.
दोषसिद्ध आरोपी सुनील कुचकोरावी सध्या कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहे. मुलीच्या लग्नाला उपस्थित राहता यावे यासाठी त्याला २३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत घरी आणि विवाहस्थळी नेण्यात यावे, असे आदेश न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने कारागृह प्रशासनाला दिले आहेत.
कुचकोरवी याला कोल्हापूर सत्र न्यायालयाने २०२१ मध्ये आईच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करणारी सरकारची याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्याने उच्च न्यायालयात याचिका करून मुलीच्या लग्नाला उपस्थित राहता यावे यासाठी एक आठवडय़ाची तात्पुरत्या जामिनाची मागणी केली होती.
हे प्रकरण सोमवारी सुनावणीसाठी आले त्यावेळी याचिकाकर्त्यांला खुनाच्या प्रकरणात फाशीची शिक्षा का ठोठावण्यात आली, खून अमानवी होता का, असा प्रश्न न्यायालयाने केला. त्यावर याचिकाकर्त्यांने मद्यधुंद अवस्थेत आईची हत्या केली होती आणि तिचे अवयव काढून ते टेबलवर ठेवले होते, असे त्याचे वकील युग चौधरी यांनी सांगितले. तसेच त्याने आईची हत्या करण्यामागील हेतू स्पष्ट झाला नाही. त्याने हे कृत्य का केले याचे त्याच्या कुटुंबीयांनाही कोडे आहे. तो एक चांगला माणूस आहे. त्याला कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. सततच्या डोकेदुखीच्या त्रासाने तो मद्याच्या आहारी गेला होता, असेही चौधरी यांनी सांगितले. आईचे अवयव खाण्याच्या उद्देशाने त्याने तिची हत्या केल्याचा पोलिसांचा आरोप होता. दरम्यान, याचिकाकर्त्यांची घरची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे मुलीच्या लग्नासाठी त्याला नेताना लागणाऱ्या पोलीस संरक्षणाचा खर्च तो देऊ शकत नाही हेही चौधरी यांनी न्यायालयाला सांगितले.