मुंबई : जेवणाच्या ताटात माशांऐवजी वांग्याची भाजी वाढल्याने संतापलेल्या तरुणाने आईला मारहाण केली. या घटनेत आईचा मृत्यू झाला होता. उच्च न्यायालयाने या प्रकरणातील आरोपीची जन्मठेपेची शिक्षा रद्द केली. आरोपीने आईवर केलेला हल्ला हा पूर्वनियोजित नव्हता, तर रागाच्या भरात होता. त्यामुळे त्याला खुनाच्या नव्हे, तर सदोष मनुष्यवधाच्या आरोपाप्रकरणी दोषी ठरवण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. 

नरेश पवार असे आरोपीचे नाव असून तो डोंबिवलीतील निळजेपाडा येथील रहिवासी आहे. वीटभट्टीवर काम करणाऱ्या नरेश याचे १९ मार्च २०११ रोजी, सायंकाळी जेवणावरून भांडण झाले. आईने जेवणासाठी माशांऐवजी वांग्याची भाजी केल्याने आणि भाजीतील बटाटे न शिजल्याने नरेश संतापला. त्याने रागाच्या भरात आईला बेदम मारहाण केली. त्यात तिचा मृत्यू झाला. कनिष्ठ न्यायालयाने नरेशला आईच्या खूनप्रकरणी दोषी ठरवून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याला नरेशने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

नरेशने जाणूनबुजून आईची हत्या केली नाही. रागाच्या भरात त्याने हे कृत्य केले. नरेश गेल्या नऊ वर्षांपासून कारागृहात आहे, असा युक्तिवाद त्याच्या वतीने करण्यात आला होता. न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी यांच्या खंडपीठाने नरेशच्या अपिलावर निर्णय देताना त्याचा युक्तिवाद मान्य केला. तसेच त्याला खुनाच्या आरोपात दोषी ठरवण्याचा सत्र न्यायालयाचा निर्णय चुकीचा असल्याचे नमूद करून जन्मठेपेची शिक्षा रद्द केली. तसेच त्याला सदोष मनुष्यवधाच्या आरोपांतर्गत दोषी ठरवून त्याच्या शिक्षेत कपात केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.