मुंबई : माझगाव येथील प्रिन्स अली खान रुग्णालयाची इमारत धोकादायक झाली आहे का याबाबत संरचनात्मक पाहणी अहवाल चार आठवडय़ांत सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ‘आयआयटी मुंबई’ला दिले.

इमारतीची वरवर पाहणी करून तिची नेमकी स्थिती सांगणे कठीण असल्याचे मुंबई महापालिकेतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. त्यानंतर न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने रुग्णालयाच्या इमारतीची नेमकी स्थिती जाणून घेण्यासाठी आयआयटी मुंबईला इमारतीचा संरचनात्मक अभ्यास करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. हे खासगी रुग्णालय १९४५ मध्ये सुरू करण्यात आले होते. जून महिन्यात पालिकेच्या ई प्रभाग अधिकाऱ्याने रुग्णालय प्रशासनाला नोटीस बजावून इमारतीची संरचनात्मक पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही पाहणी करण्यात आली. त्यात इमारत धोकादायक असल्याचे आढळून आले.

त्यानंतर रुग्णालयाच्या मोडकळीस आलेल्या इमारतीमुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश पालिकेला द्यावेत या मागणीसाठी रुग्णालय प्रशासन आणि रुग्णालयाच्या तीन विश्वस्तांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. न्यायालयानेही याचिकेची दखल घेऊन पालिकेला इमारतीची नेमकी स्थिती काय आहे याची पाहणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्याचवेळी पालिकेचा अहवाल सादर होईपर्यंत रुग्णालयातील रुग्णांना तातडीने अन्यत्र हलवण्याचा, नवीन रुग्ण दाखल करण्यास, शस्त्रक्रिया विभागही बंद करण्यास न्यायालयाने रुग्णालय प्रशासनाला मुभा दिली होती. रुग्णालय तात्पुरते बंद करण्यात आल्याची नोटीस रुग्णालयात लावण्याचेही आदेश न्यायालयाने दिले होते.