देशभर गाजलेल्या खैरलांजीच्या सत्यघटनेवर आधारित ‘खैरलांजीच्या माथ्यावर’ या मराठी चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने दिलेले प्रमाणपत्र रद्द करून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्याच्या प्रदर्शनावरील बंदी कायम ठेवली.
भंडारा जिल्ह्य़ातील खैरलांजी येथे २९ सप्टेंबर २००६ रोजी भोतमांगे कुटुंबियांचे हत्याकांड घडले होते. केवळ कुटुंबप्रमुख भैय्यालाल हे त्यातून बचावले. या हत्याकांडामुळे समाजमन ढवळून निघाले आणि राज्यात ठिकठिकाणी दलितांच्या संतापाचा उद्रेक होऊन हिंसक घटना घडल्या होत्या. या सत्य घटनेवर आधारित असलेल्या ‘खैरलांजीच्या माथ्यावर’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
भैयालाल भोतमांगे यांच्यासह अ.भा. धम्मसेनेचे अध्यक्ष रवी शेंडे यांनी एका याचिकेद्वारे या चित्रपटाच्या प्रदर्शनाला आव्हान दिले होते.  हा चित्रपट तयार करताना आपल्याला विचारणा करण्यात आली नव्हती, असा दावा भोतमांगे यांनी केला होता. निर्मात्यांनी आपले चित्रण दारुडा आणि भेकड असे दाखवतानाच, आपल्या मुलीचीही प्रतिमा मलीन केली आहे. मुलीवरील अत्याचारांना जणू आम्हीच कारणीभूत असल्याचा आभास चित्रपटातून होतो. त्यामुळे चित्रपटातील काही दृश्ये वगळण्यात यावीत आणि तोवर चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये, अशी विनंती याचिकाकर्त्यांची केली होती.
न्या. भूषण धर्माधिकारी व न्या. झेड.ए. हक यांनी ६ फेब्रुवारी रोजी प्राथमिक सुनावणीनंतर प्रदर्शनास अंतरिम स्थगिती दिली होती. अखेर  चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये वगळावीत, चित्रपटाला नव्याने प्रमाणपत्र देताना भैयालाल यांचे म्हणणे विचारात घेण्यात यावे, त्यांच्याकडून वस्तुस्थिती जाणून घ्यावी आणि मगच चित्रपट प्रमाणित करण्यात यावा, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.
समाजप्रबोधन करणाऱ्या चित्रपटाची अडवणूक करणे अयोग्य : कल्पना सरोज
खैरलांजीची घटना ही देशातली अत्यंत लाजिरवाणी घटना होती. अशा घटना घडू नये हा संदेश देण्यासाठी म्हणा किंवा हा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी ‘खैरलांजीच्या माथ्यावरती’ हा चित्रपट करायचा निर्णय घेतला होता. चित्रपट करताना काही गोष्टींचे स्वातंत्र्य घेण्याची मुभा निर्माते-दिग्दर्शकांना असते. नाहीतर तो केवळ एक माहितीपट उरतो. हा चित्रपट करतानाही आम्ही काही गोष्टी बदलल्या पण, त्यामुळे मूळ घटनेचा विपर्यास होईल असे केलेले नाही. हे स्पष्ट करूनही अशाप्रकारे अडवणूक करणे योग्य नाही. नागपूर खंडपीठाने दिलेला निर्णय अजून माझ्या हातात आलेला नाही. तो समजून घेतल्यावरच पुढे काय ते ठरवू, असे निर्मात्या सरोज म्हणाल्या.