नवलखा यांना हे पुस्तक नाकारल्याने न्यायालयाकडून आश्चर्य
मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचे प्रेरणास्थान असलेले इंग्रजी भाषेतील प्रसिद्ध विनोदी लेखक पी. जी. वूडहाउस यांचे पुस्तक शहरी नक्षलवादाच्या आरोपांप्रकरणी अटकेत असलेले मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांना देण्यास तळोजा कारागृह प्रशासनाने नकार दिला. सुरक्षेला धोका असल्याचा दावा करून पुस्तक उपलब्ध करून देण्यास नकार देण्याच्या कारागृह प्रभासनाच्या भूमिकेबाबत उच्च न्यायालयाने सोमवारी आश्चर्य व्यक्त केले. त्याचबरोबर प्रशासनाचा सुरक्षेबाबतचा दावा हास्यास्पद असल्याचेही ताशेरेही ओढले. आजारपणामुळे आपल्याला कारागृहाऐवजी घरातच नजरकैदेत ठेवण्यात यावे या मागणीसाठी नवलखा यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. तळोजा कारागृहातील स्थिती दयनीय असून नवलखा यांना तेथे आवश्यक त्या मूलभूत सुविधाही उपलब्ध केल्या जात नाहीत. त्यांना बसण्यासाठी साधी खुर्चीही दिली जात नाही. आता त्यांना पुस्तकेही नाकारली जात आहेत. वूडहाउस यांचे एक विनोदी पुस्तक नवलखा यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यासाठी पाठवले होते. परंतु हे पुस्तक धोकादायक असल्याचे सांगून कारागृह प्रशासनाने ते नाकारल्याचे नवलखा यांच्या वकिलाने सांगितले.