मुंबई : ‘तुला अक्कल नाही’, ‘तू वेडी आहेस’ यांसारखी वाक्ये मराठी कुटुंबात सर्रास ऐकायला मिळतात. त्यामुळे, ही वाक्ये उच्चारताना अपमान करण्याचा हेतू नसेल, तर या वाक्यांना गैरवर्तन, अपशब्द म्हणता येणार नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. पतीची घटस्फोटाची मागणी स्वीकारताना न्यायालयाने हा निर्वाळा दिला.
घटस्फोटाची मागणी फेटाळण्याच्या कौटुंबीक न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पतीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तर, पतीने आपला मानसिक आणि शारिरीक छळ केल्याचा आरोप करणारी याचिका पत्नीनेही केली होती. त्यात, पतीने आपल्याला, ‘तुला अक्कल नाही’, ‘तू वेडी आहेस’, असे अपशब्द आपल्यासाठी वापरले. तसेच, रात्री उशीरा बाहेर फिरायला न्यायला सांगितले म्हणून आपल्यावर ओरडला. पतीने आपला मानसिक आणि शारिरीक छळ केल्याचा दावाही पत्नीने केला होता.
हेही वाचा >>> मुंबई : न्यायमूर्ती आरोपीला अनुकूलता दर्शवत असल्याचा पत्राद्वारे दावा; उच्च न्यायालयाचे चौकशीचे आदेश
न्यायालयाने मात्र, ‘तुला अक्कल नाही’, ‘तू वेडी आहेस’ ही वाक्ये महाराष्ट्रीय कुटुंबीयांत सर्रासपणे बोलली जात असल्याचे म्हटले. कोणत्याही स्तरातील मराठी कुटुंबात ही वाक्ये अनेकदा उच्चारली जातात. ही वाक्ये उच्चारताना व्यक्तीला अपमानित करण्याचा हेतू नसतो. त्यामुळे, या वाक्यांना गैरवर्तन किंवा अपशब्द म्हणता येणार नाही, असे न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>> Mumbai Local Megablock : मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मे गाब्लॉक
आपल्यासमोरील प्रकरणाचा विचार केला असता ही वाक्ये नेमकी कधी आणि कोणत्या स्थितीत पतीकडून उच्चारली गेली याचा तपशील याचिकाकर्तीने दिलेला नाही. त्यामुळे, पतीने याचिकाकर्तीला अपमानित करण्याच्या हेतूने ही वाक्ये वापरल्याचे म्हणता येणार नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले. दुसरीकडे, पत्नीने केलेले क्रुरतेचे आरोप फेटाळण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णयही खंडपीठाने कायम ठेवला. पत्नीने केलेली तक्रार आणि सादर केलेल्या पुराव्यांमध्ये साधर्म्य आढळून येत नाही. याउलट, तिने पतीला खोट्या, बिनबुडाच्या आणि बेजबाबदार आरोपांमध्ये अडकवल्याचे आढळते, तिच्या अशा आरोपांमुळे पतीची आणि कुटुंबियांची समाजात असलेली प्रतिष्ठा मलीन झाली. पतीला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. ही बाब हिंदु विवाह कायद्यांतर्गत क्रूरता म्हणता येऊ शकते, असे अधोरेखित करून न्यायालयाने पतीचा घटस्फोटाचा अर्ज स्वीकारला.