मुंबई : दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तेशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती गंभीर असल्याचे उच्च न्यायालयाने शुक्रवारी मान्य केले. तसेच मलिक यांनी जामिनासाठी केलेल्या याचिकेवर पुढील आठवडय़ापासून गुणवत्तेच्या आधारे सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले.

मलिक यांनी वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्याच्या मागणीसाठी याचिका केली आहे. त्याच वेळी त्यांची याचिका गुणवत्तेच्या आधारेही ऐकली जावी, अशी मागणीही मलिक यांनी केली आहे. मात्र आर्थिक गैरव्यवहार कायद्यातील आजारी व्यक्तीच्या संकल्पनेत मलिक मोडतात का ? अशी विचारणा करून त्यांची प्रकृती खरोखर चिंताजनक आहे हे पटवून देण्याचे आदेश न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी मलिक यांच्या वकिलांना दिले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या एकलपीठासमोर शुक्रवारी मलिक यांची याचिका सुनावणीसाठी आली. त्यावेळी मलिक यांच्यातर्फे वरिष्ठ वकील अमित देसाई यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मलिक यांना गंभीर आजार असल्याचे न्यायमूर्ती कर्णिक यांनी मान्य केले.